बीड

हिंदू जनआक्रोश मोर्चात ब्रम्हगाव प्रकरणावर संतापाचा उद्रेक

हिंदू जनआक्रोश मोर्चात ब्रम्हगाव प्रकरणावर संतापाचा उद्रेक
हनुमान मंदिर विटंबना प्रकरणी कठोर कारवाई करा – आ.गोपीचंद पडळकर, आ.संग्राम जगताप, डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील
हिंदुत्ववादी नेत्यांची प्रशासनावर टीका; मोर्चात हजारो हिंदू बांधवांचा सहभाग
गेवराई : प्रतिनिधी
   गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथील श्री हनुमंतरायाच्या मूर्तीवर गोमांस व रक्त टाकून विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गेवराई तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने उमापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या विविध भागांतून हजारो हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जाहीर सभेचे स्वरूप आलेल्या या मोर्चाला संत-महंत, लोकप्रतिनिधी, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  व्यासपीठावर महंत हभप श्री दत्तागिरी महाराज (श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव), आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, हिंदू जागरण मंचाचे देवगिरी प्रांत संयोजक अंबादास अंभुरे आणि भाजपचे विधानसभा समन्वयक श्रीकांत सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. ब्रम्हगाव प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा, धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढविणे, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करणे आणि समाजात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक, धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सहकार्य केले. उमापूर परिसर भगव्या ध्वजांनी आणि जयघोषांनी दुमदुमून गेला होता.
चौकट –
प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी – गोपीचंद पडळकर
    हिंदू जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ब्रम्हगाव येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या असून प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्याही धर्म, जात किंवा समाजघटकाच्या दबावाखाली न जाता निष्पक्षपणे कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच शासकीय जागांवरील अतिक्रमणांचा सर्वंकष आढावा घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पारदर्शक आणि न्याय्य भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चौकट –
हिंदू समाजाच्या प्रश्नांवर विधानमंडळात आवाज उठविणार – संग्राम जगताप
    आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाशी संबंधित विविध प्रश्नांवर भाष्य केले. धार्मिक स्थळांची विटंबना, गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद यांसारख्या विषयांवर सातत्याने विधानमंडळात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक घटकांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदू हिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या सुरक्षेसाठी आणि धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
चौकट –
छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून संघटित व्हा – डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा उल्लेख करत समाज संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवरायांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले, त्याच आदर्शातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जाती-पाती, पक्षीय राजकारण आणि वैयक्तिक मतभेद विसरून समाजहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. हिंदू समाज संघटित आणि सजग राहिल्यास अशा घटनांना प्रभावी उत्तर देता येईल तसेच समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे ते म्हणाले. सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रहित यांना प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चौकट –
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी पुढाकार आवश्यक – महंत दत्तागिरी महाराज
    महंत दत्तागिरी महाराज यांनी ब्रम्हगाव येथील घटनेचा निषेध नोंदवत धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. हनुमंतरायाच्या मूर्तीवर गोमांस टाकण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होते, त्यामुळे दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि धार्मिक संघटनांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी संत-महंतांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
चौकट –
श्रीकांत सानप यांच्या भूमिकेचे वक्त्यांकडून कौतुक
    हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान विविध मान्यवर वक्त्यांनी भाजपाचे गेवराई तालुका समन्वयक श्रीकांत सानप यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. ब्रम्हगाव येथील घटनेनंतर त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली, असे वक्त्यांनी सांगितले. हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनापासून ते यशस्वी आयोजनापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नमूद करण्यात आले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचेही मान्यवरांनी कौतुक केले. हिंदू समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेऊन जनतेशी संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
चौकट –
गोमाता मंदिराचे भूमिपूजन; दरवर्षी स्मृतिदिन साजरा करण्याचा संकल्प
  ब्रम्हगाव येथील धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ हनुमान मंदिर परिसरात गोमाता मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी गोमातेप्रती श्रद्धा व्यक्त करत समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनाचा संकल्प केला. यापुढे दरवर्षी या दिवशी गोमाता स्मरणार्थ विशेष पूजन, हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमामुळे समाजात धार्मिक जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक, भाविक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Back to top button