बीड
शाळांना वाटप करण्यासाठी आलेल्या प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाने जाळून टाकल्या

शाळांना वाटप करण्यासाठी आलेल्या प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाने जाळून टाकल्या
———-
आष्टीतील शिक्षण विभागाचा प्रताप
———
आष्टी, प्रतिनिधी :-मार्चअखेर अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्तरावरून घेण्यात येणा-या इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पॅट’ चाचणी परीक्षांसाठी आलेल्या प्रश्नपत्रिकांचे शाळांना वितरण न करता चक्क पाच ते सहा पोते प्रश्नपत्रिका जाळून त्यांची होळी करण्यात आल्याचा प्रकार आष्टी येथील शिक्षण विभागाने केल्याचे सोमवारी (दि. सात) उघड झाले.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येते. वेळापत्रकानुसार यावर्षीच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि. ८) सुरवात होणार आहे. ता. २५ एप्रिलपर्यंत चालणा-या या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने शाळांच्या मागणीनुसार वितरणासाठी प्रश्नपत्रिका संच आष्टी येथील शिक्षण विभागाकडे पाठविले होते.
मात्र, या प्रश्नपत्रिका संचांचे शाळांना वितरण न करता शिक्षण विभागाने चक्क प्रश्नपत्रिका संचांनी भरलेल्या पाच ते सहा गोण्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या एका खोलीत जाळून टाकल्याचे सोमवारी (दि. ७) सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आले.
(चौकट)
याबाबत शिक्षण विभागाकडे चौकशी केल्यानंतर शिक्षण विभागाने टोलवाटोलवी करण्यास सुरवात असून या प्रश्नपत्रिका जुन्या कालावधीतील शिल्लक रद्दी असल्याने त्या कागदांचे ओझे कमी करण्यासाठी जाळण्यात आल्याचे सांगितले. तर, जाळण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या उद्यापासून सुरू असलेल्या परीक्षेच्या असल्याचे काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
(चौकट)
एकीकडे शाळांना भुर्दंड, दुसरीकडे होळी
शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका संचांचे शाळांना वितरण करण्याचे आदेश असताना विभागाने या प्रश्नपत्रिकांचे काही शाळांना वितरण केले तर काही शाळांत एक संच देऊन त्याच्या झेराॅक्स काढून तुम्ही विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या तोंडी सूचना दिल्या. यामुळे शाळांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असून दुसरीकडे याच प्रश्नपत्रिकांचे वितरण न करता होळी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
((त्या जुन्या प्रश्नपत्रिका होत्या त्यांची परीक्षा होऊन गेलेली आहे जुन्या प्रश्नपत्रिका पुठ्ठे आणि न लागणारे कागदपत्रे सध्या कार्यालयाचे रंग काम चालू आहे त्यामुळे त्या जाळल्या आहेत
(सुधाकर यादव, गटशिक्षणाधिकारी, आष्टी)



