बीड
बीडच्या खाजगी कोचिंगमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर तात्काळ कडक कारवाई करा – एसएफआय

बीडच्या खाजगी कोचिंगमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर तात्काळ कडक कारवाई करा – एसएफआय
बीड (ता. २७) : बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) बीड जिल्हा कमिटी या घटनेचा तीव्र निषेध करते. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी एसएफआय करते. तसेच या घटनेच्या निषेधार्थ एसएफआय सोबत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन एसएफआय करते.
या कोचिंग मधील शिक्षक विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी तिथे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची अतिशय धक्कादायक व संतापजनक घटना नुकतीच समोर आली. शैक्षणिक क्षेत्राला कलंक लावणाऱ्या या दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एसएफआय करते. या शिक्षकांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे देखील समजते परंतु हे, दोन्ही आरोपी सध्या फरार झालेले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून जेरबंद करणे आवश्यक आहे.
या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमाकिरण क्लासेस हे बीडमधील एक प्रमुख खाजगी शिकवणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते, मात्र अशा प्रकारच्या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण संस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या घटनेची तीव्रता व गांभीर्य लक्षात घेऊन विजय पवार व प्रशांत खाटोकर या नराधमांना तात्काळ अटक करण्यात यावी, उमाकिरण क्लासेसच्या परवान्याची चौकशी करून या क्लासेसची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, पीडित विद्यार्थिनीला तात्काळ मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर आधार पुरवण्यात यावा, शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा आणि महिलांकरिता समुपदेशन केंद्र सुरु करावीत.
या व इतर कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणाला पाठिशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा एसएफआय सर्वत्र आंदोलन छेडेल असा इशारा एसएफआय बीड जिल्हा कमिटीच्या वतीने देण्यात येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र विद्यार्थ्यांनी एसएफआय सोबत रस्त्यावर उतरून आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन एसएफआय चे राज्याध्यक्ष रोहिदास जाधव, बीड जिल्हाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हासचिव पवन चिंचाने, राज्य सहसचिव लहू खारगे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे, जिल्हा सहसचिव सारंग भगत, आरती साठे, पायल कोळी, हमीद शेख, हर्षद डाके, प्रथमेश उफाडे, संकल्प साठे, आनंद सक्राते, रामेश्वर जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे.



