बीड

घारगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण गाय गाळात अडकली, 8 तासांनंतर सुटका

घारगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण
गाय गाळात अडकली, 8 तासांनंतर सुटका
गावकर्‍यांची मागणी-घारगाव ते लिंबागणेश शिव रस्ताची तातडीने दुरुस्त करावा
घारगाव । प्रतिनिधी:-मौजे घारगाव ते लिंबागणेश या शिव रस्त्याची दुरवस्था आणि दुरुस्ती अभावी शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या निकृष्ट रस्त्यामुळे नुकतीच एक गंभीर घटना घडली आहे. शेतकरी भालचंद्र माणिकराव ढास यांच्या मालकीची गाय चिखलात अडकली आणि तब्बल आठ ते नऊ तास गाळात फसून राहिली.
रस्ता खराब असल्यामुळे शेतात जाणे कठीण झाले असून, याच पार्श्वभूमीवर सदर घटना घडली. ढास दांपत्य आपल्या गायीसह शेतात गेले होते. रात्रीच्या वेळेस गाय अचानक चिखलात फसली. अंधारामुळे व रस्त्याच्या अडचणीमुळे कुणालाही कल्पना येऊ शकली नाही. शेतकरी आणि गाय घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता ही बाब उघड झाली. भालचंद्र ढास आणि त्यांच्या पत्नीने गायीला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र गाळ घट्ट झाल्यामुळे त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी गावातल्या काही लोकांना मदतीसाठी बोलावले. गावकर्‍यांनी धाव घेत गायीची सुटका केली. गायीला गाळातून बाहेर काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले. या सार्‍या घटनेने ढास कुटुंबाला मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. ही घटना ऐकून गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला असून घारगाव ते लिंबागणेश रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
गावकर्‍यांचे म्हणणे आहे
हा रस्ता आमच्या शेतीसाठी अत्यावश्यक आहे. मात्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. जनावरं, शेतकरी आणि वाहनधारक सगळेच अडचणीत येतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सदर घटना प्रशासनाला डोळे उघडणारी ठरावी अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
शेतकर्‍यास नुकसान भरपाई द्यावी
सदरील गाय गंभीर असून, ती शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळे दुभती गाय मरणाच्या दारावर असल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भालचंद्र माणिकराव ढास यांची माहिती
राहणी : मौजे घारगाव
व्यवसाय : शेती
पीडित गाय : पिकशेत गाळात अडकली
गायीची सुटका : 8 तासांच्या प्रयत्नांनंतर गावकर्‍यांच्या मदतीने
———-
Back to top button