एकल पालक महिलांसाठी तिळगुळ स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : पंतजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या वतीने एकल पालक महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला तिळगुळ श्री सन्मान स्नेहमिलन व हळदीकुंकू सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सामाजिक उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संगीता गोविंद मेण यांनी पुढाकार घेतला. पतीच्या निधनानंतर महिलांना समाजात दिली जाणारी दुय्यम वागणूक, विशेषतः शुभकार्यांतून त्यांना वगळण्याची अन्यायकारक प्रथा यावर या कार्यक्रमातून प्रभावी संदेश देण्यात आला.
“पतीच्या निधनानंतर त्या महिलेचा काय दोष असतो? आयुष्यभर पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, सुख-दुःखात सहभागी असणाऱ्या महिलांना समाज शुभकार्यातून का वगळतो?” असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही कुटुंबासाठी झगडणाऱ्या, आई-वडील दोन्ही भूमिका निभावणाऱ्या या महिलांचे आयुष्य संघर्षमय असते. मात्र संक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी त्यांना हळदीकुंकूपासून वंचित ठेवले जाते, ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
महिलांच्या भावना समजून घेत, ही अन्यायकारक प्रथा मोडीत काढण्यासाठी डॉ. संगीता मेण यांच्या पुढाकारातून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मीना दिलीप अंबुलकर, आशाताई सुधीर वानखडे दाभाडे, संगीता उके, शोभा थोरात आदी मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान अनेक एकल पालक महिलांना अश्रू अनावर झाले. अक्षरशः ढसाढसा रडत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा क्षण सर्व उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला.
या उपक्रमासाठी मोठी मढी महिला योग वर्ग, माळीपुरा, सुर्जी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच राधेश्याम मंडप डेकोरेशन, सुर्जीचे प्रशांत दादा पवार यांनीही सहकार्य केले. विविध संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.



