📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; विधानपरिषदेचे सभापतींची भावनिक पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; विधानपरिषदेचे सभापतींची भावनिक पोस्ट

कर्तृत्वाचं पर्व थांबलं… दादांची आठवण कायम – सभापती प्रा. राम शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्व, धाडस आणि निर्णयक्षमतेचं मोठं पर्व आज अचानक थांबलं, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित (दादा) पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अजित (दादा) पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठाम, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता, त्यांच्या निर्णयांमध्ये धाडस होते आणि त्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांना दिशा देण्याची ताकद होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने केवळ एक उपमुख्यमंत्री नाही, तर एक संघर्षशील आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.या दुःखद घटनेनंतर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत दादांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,कर्तृत्व, धाडस आणि निर्णयक्षमतेचं मोठं पर्व आज अचानक थांबलं. दादांच्या ठाम आवाजासोबत अनेक स्वप्नं, अनेक आशा आज निशब्द झाल्या…
या शब्दांतून प्रा. शिंदे यांनी दादांच्या जाण्याने निर्माण झालेली भावनिक पोकळी अधोरेखित केली आहे.

दादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान होते. अनेकांच्या आशा-अपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर टिकून होत्या.दादा, तुमची आठवण कायम राहील…” असे म्हणत प्रा. शिंदे यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा ठसा, जनतेशी असलेली नाळ आणि निर्णयक्षमतेचा वारसा कायम स्मरणात राहील, अशी भावना कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

मा.ना.प्रा. राम शिंदे
सभापती- विधानपरिषद ,महाराष्ट्र राज्य

Back to top button