📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिगीषा खुल्या एकांकिका स्पर्धेची घोषणा

जिगीषा खुल्या एकांकिका स्पर्धेची घोषणा

छत्रपती संभाजीनगर (दि. ११) : गेली ३ वर्षे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित होणाऱ्या ‘जिगीषा नाट्यसहवासा’त यावर्षीपासून एका नवीन उपक्रमाची भर पडणार आहे. मराठवाड्यातील रंगकर्मीसाठी ‘जिगीषा खुली एकांकिका स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत महाविद्यालयीन संघ, हौशी नाट्यसंस्था, बँक संघटना असे सर्वच जण सहभागी होऊ शकतात. ही एकांकिका स्पर्धा ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन’ आणि जिगीषा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून ती फक्त ‘मराठवाडा’ विभाग पुरतीच मर्यादित आहे.

‘जिगीषा’ची मूळ स्थापना छत्रपती संभाजीनगरमध्ये १९८३ साली झाली आणि पुढे काही वर्षांनंतर ‘जिगीषा’चे प्रमुख सभासद मुंबईला स्थलांतरित झाले. पण आपल्या मूळ जन्मभूमीशी असलेलं नातं घट्ट रहावं म्हणून ‘जिगीषा’ नाट्यसंस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये हा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाचा हा चौथा ‘नाट्यसहवास’ असून दरवर्षी नाट्यविषयक एक नवीन उपक्रम या महोत्सवात समाविष्ट करण्यात येतो

हि स्पर्धा एकूण तीन प्राथमिक केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. यात नांदेड, बीड व छत्रपती संभाजीनगर या केंद्रांचा समावेश आहे. नांदेड केंद्राची स्पर्धा मा. डी. पी. सावंत यांच्या विशेष सहकार्याने व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने   दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे (सहभागी जिल्हे : नांदेड, परभणी, हिंगोली), बीड केंद्राची स्पर्धा मा. डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या विशेष सहकार्याने व नाट्यशास्त्र विभाग के. एस. के. कॉलेज बीड  यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी के. एस. के. कॉलेज बीड येथे (सहभागी जिल्हे : बीड, लातूर, धाराशीव), छत्रपती संभाजीनगर केंद्राची स्पर्धा एम जी एम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. ३ व ४ ऑगस्ट २०२६ रोजी रुक्मिणी सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे (सहभागी जिल्हे : जालना, छत्रपती संभाजीनगर) आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख दि. १० जुलै २०२६ आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी रुक्मिणी सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे होईल. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संध्या. उद्घाटन समारंभात स्पर्धेच्या अंतिम फेरीचा  पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. या स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या संघांना सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) रु.५१,०००/, सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – रु. ३१,०००/-, सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – रु. २१,०००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशी रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येतील.

स्पर्धेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०९६७७११), श्रीपाद पद्माकर (९९२०८८५७३०) व किशोर नरवडे (९८९०५४००८८) यांच्याशी संपर्क साधावा. एकांकिका स्पर्धेचा प्रवेश अर्ज आणि नियमावली https://bit.ly/JigishaEkankika या लिंकवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत नाट्य संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महोत्सवाचे आयोजक चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, दासू वैद्य, नीलेश राऊत, नांदेड केंद्राचे संयोजक बापू दासरी, शिवाजी गावंडे, बीड केंद्राचे संयोजक संजय पाटील देवळाणकर, प्रतिमा जोशी, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, डॉ. शिव कदम, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

Back to top button