बीड
सिंदफणाच्या क्रिकेटपटूंचा दणका! राष्ट्रीय स्पर्धेत ६ मुलींची थेट एंट्री

सिंदफणाच्या क्रिकेटपटूंचा दणका! राष्ट्रीय स्पर्धेत ६ मुलींची थेट एंट्री
सी.बी.एस.ई. साऊथ झोन-२ मध्ये मारली बाजी
माजलगाव प्रतिनिधी :-विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या युवा क्रिकेटपटूंनी २०२५-२६ साऊथ झोन-२ सी.बी.एस.ई. क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. या उत्कृष्ट यशामुळे शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित या महत्त्वाच्या स्पर्धेत सिंदफणा शाळेच्या १४, १७ व १९ वर्षाखालील मुले-मुलींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी पदके मिळवून शाळेचे नाव उजळवले आहे.१४ वर्षाखालील मुलांमध्ये आर्यन बनसोडे याने कांस्यपदक पटकावले आहे. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात मानसी जगताप, अनन्या मुंडे, रिद्धी डाके, पूर्वा मालानी, संस्कृती मळवाडे, श्रेया जाधव आणि वेदिका गवते या सात खेळाडूंनी रौप्यपदक मिळवले आहे. तसेच या गटातीलच शेजल विभुते आणि कार्तिकी सुरवसे या दोन आणि १९ वर्षाखालील मुलींच्या गटातून आरुषी कुलकर्णी, अक्षरा सोळंके, अनुष्का सोळंके आणि रोहिणी मीटे या चार प्रतिभावान खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे होणाऱ्या सी.बी.एस.ई. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत हे खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळविली आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मा. आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख आणि उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख जीबी, ऑगस्टन, सुनिता सुरवसे धनंजय सोमवंशी,अर्चना जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे. खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे मुख्य प्रशिक्षक सचिन मंजुळे, क्रीडा शिक्षक दीपक माने, पुरुषोत्तम सोळंके आणि वैशाली सोळंके यांच्या योगदानाचेही विशेष कौतुक करण्यात आले आहे.
“आमच्या मुली-मुलांनी दाखवलेली ही कामगिरी महाराष्ट्राच्या खेळप्रेमी जनतेसाठी अभिमानाचा विषय आहे. साऊथ झोन २ स्तरावरील या विजयाने राष्ट्रीय मंचावर आमच्या प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळवून दिली आहे. मला खात्री आहे की भोपाळच्या राष्ट्रीय स्पर्धेत आमचे खेळाडू महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवतील आणि देशभरातील प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतील.”
मंगलाताई प्रकाशदादा सोळंके ( सचिव, सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगाव.)



