बीड
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योतीताई मेटेंची नियुक्ती करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योतीताई मेटेंची नियुक्ती करण्याची मागणी
– डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२१): नुकत्याच रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संवेदनशील, उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेल्या डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे अत्यंत जबाबदारीचे असून महिलांचे घटनात्मक हक्क, सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करण्याचे महत्त्वाचे कार्य या पदावरून केले जाते. महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यांसारख्या प्रकरणांची दखल घेऊन सखोल चौकशी करणे आणि योग्य ती कारवाई करणे ही आयोगाची प्रमुख जबाबदारी आहे.
तसेच, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवणे, महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती करणे, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मोहिमा राबवणे, तसेच कारागृह व सुधारगृहांमध्ये महिलांच्या स्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करणे, ही देखील आयोगाची महत्त्वाची कार्ये आहेत.
सध्याच्या काळात वाढत असलेल्या सायबर गुन्हे आणि कार्यस्थळी होणाऱ्या छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे डॉ. ज्योतीताई मेटे यांसारख्या पात्र उमेदवाराची नियुक्ती करून महिला आयोगाची प्रतिमा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्याची संधी शासनाने साधावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.
—
गणेश ढवळे (लिंबागणेशकर)
मो. नं. ८१८०९२७५७२



