बीड

लिंबागणेश येथील ‘एसआयआर’ विशेष शिबिराची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली पाहणी

लिंबागणेश येथील ‘एसआयआर’ विशेष शिबिराची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली पाहणी
ग्रामपंचायत स्तरावरील विशेष शिबिरातून मतदार गणना प्रपत्र भरणे, कागदपत्र पडताळणी व मतदार यादी अद्ययावतीकरणाला गती
**लिंबागणेश, दि. ८ :** भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७ ते १० जुलै या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत असून बुधवारी (दि. ८) बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरविण्यात आलेल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, महसूल अधिकारी गणपत पोतदार, महसूल अधिकारी प्रमोद कोळपकर, महसूल सेवक ललित काकडे उपस्थित होते
यावेळी तहसीलदार शेळके यांनी पर्यवेक्षक राजेंद्र येडे, बूथस्तरीय अधिकारी तथा सहशिक्षक दिपक घाटे आणि भालचंद्र शिक्षण संस्थेचे शिक्षक शामराव ढास , सहशिक्षिका श्रीमती अयाचित,श्रीमती सानप,श्रीमती गिते यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक पात्र मतदाराचे गणना प्रपत्र अचूकपणे भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेत अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर, समीर शेख, विनोद मोरे, अशोक थोरात, संदीप पौळ, दासू थोरात आदी उपस्थित होते.
**▌चौकट**
### **प्रत्येक गावात विशेष शिबिरांद्वारे प्रपत्र भरण्याची सुविधा**
एसआयआर अभियानांतर्गत प्रत्येक गावात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून बूथस्तरीय अधिकारी व नियुक्त सहाय्यक कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून गणना प्रपत्रांचे वाटप, प्रपत्र भरणे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. पावसाळ्याचा विचार करून जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षित ठिकाणी शिबिरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
**▌चौकट**
### **जनजागृतीमुळे अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद**
दवंडी, ध्वनिक्षेपक, समाजमाध्यमे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार, ग्रामरोजगार सेवक, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कृषी सहाय्यक आदी कर्मचाऱ्यांची बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घराघरात पोहोचून गणना प्रपत्रांचे वितरण, पडताळणी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम वेगाने सुरू असून अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button