बीड
कोळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

कोळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरास गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये कोळगावसह परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध शासकीय योजनांची माहिती, महसूल विषयक अडचणी, सातबारा, फेरफार, पीकविमा, कृषी योजनांबाबत मार्गदर्शन तसेच आरोग्य विभागाच्या विविध सेवांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार संदीप खोमणे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन व विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.
शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधला गेल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.



