बीड

दुर्गम भागातील त्या ८ चिमुकल्यांच्या आयुष्यात नवी पहाट; डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशनचा ‘आरोग्य संकल्प’ तडीस!

दुर्गम भागातील त्या ८ चिमुकल्यांच्या आयुष्यात नवी पहाट; डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशनचा ‘आरोग्य संकल्प’ तडीस!
रायगडच्या ग्रामीण भागातील मुलांवर पनवेलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; माणुसकीच्या झऱ्याने चिमुकल्यांना दिले नवजीवन
श्रीवर्धन (संदेश घोलप)काही स्वप्ने केवळ स्वतःसाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी असतात, याचा प्रत्यय श्रीवर्धनमध्ये आला आहे. रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरजू मुलांच्या आरोग्यासाठी डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशनने पाहिलेले स्वप्न अखेर यशस्वी वास्तवात उतरले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, गंभीर व्याधींनी ग्रस्त असलेल्या ८ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात ‘आरोग्याची नवी दिशा’ उमलली आहे.
या मोहिमेची सुरुवात ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली होती. दुर्गम तालुक्यातील अनेक मुले उपचारांअभावी व्याधींशी झुंजत असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. राजेश पाचारकर यांनी पुढाकार घेतला. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित ‘बालरोग सुपर स्पेशालिटी’ शिबिरात श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड तालुक्यातील शेकडो मुलांची तपासणी झाली. यातून ८ अत्यंत गरजू मुलांची निवड पुढील प्रगत उपचारांसाठी करण्यात आली होती.
ठाणे येथील ‘जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट’च्या मोलाच्या सहकार्यामुळे या मोहिमेला बळ मिळाले. फाउंडेशनच्या टीमने केवळ शिबिर घेऊन न थांबता, थेट मुलांच्या गावांना भेटी देऊन पालकांचे समुपदेशन केले. ११ एप्रिल २०२६ रोजी या सर्व बालकांना पनवेल येथील ‘व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ बाल शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. राजेश पाचारकर यांनी स्वतः समन्वयकाची महत्त्वाची भूमिका बजावली. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत सुरक्षित नेणे, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करणे आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेणे, या सर्व टप्प्यांवर त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले. डिस्चार्जच्या वेळी मुलांना खाऊ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि पालकांच्या डोळ्यांतील कृतज्ञता हा क्षण सर्वांसाठीच भावूक ठरला. शस्त्रक्रियेनंतर या मुलांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून, त्यांना आवश्यक त्या पोस्ट-ऑपरेटिव्ह सूचनांसह घरी सोडण्यात आले आहे. आगामी काळात त्यांच्यावर फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीचे उपचार सुरू राहणार असून, फाउंडेशन यापुढील काळातही त्यांच्या आरोग्यासाठी कटीबद्ध असणार आहे. या यशामध्ये सहभागी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे डॉ. पाचारकर यांनी आभार मानले आहेत.
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचावी, हा आमचा उद्देश होता. या उपक्रमामुळे अनेक घरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले, याचे समाधान मोठे आहे.”
— डॉ. राजेश पाचारकर
Back to top button