बीड

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची दीपक देशमुख यांनी घेतली भेट

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची दीपक देशमुख यांनी घेतली भेट
फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घेऊन सौ.संध्या दीपक देशमुख व दीपक देशमुख यांना तत्काळ संरक्षणाची मागणी
*_अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही_*
परळी शहरात मतदान २० डिसेंबर रोजी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे
बीड/ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन सौ. संध्या देशमुख व दीपक देशमुख यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र परळी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी दखल घेत नसल्याने, व अद्याप संरक्षण न मिळाल्याने ही भेट घेण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या परळी शहरात निवडणूक काळात होत व आहे असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या  २० डिसेंबर रोजी परळी शहरात पाच नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे पती बाजीराव धर्माधिकारी यांची कथित फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या संभाषणात दीपक देशमुख यांचे नाव येत असल्याने ते ‘रडारवर’ आल्याचे स्पष्ट होत असून, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता, संभाव्य धोका टाळण्यासाठी सौ. संध्या दीपक देशमुख व दीपक रंगनाथ देशमुख यांना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे, परळी शहर पोलीस स्टेशचे अधिकारी व कर्मचारी संबंधित प्रकरणात दखल घेत नाही. दोन वेळा या प्रकरणी ते पोलीस स्टेशनला जाऊन आले. तसेच संबंधित कथित फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Back to top button