आरोग्य

जिल्ह्यात स्क्रब टायफसबाबत खबरदारी बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन अंजनगाव सुर्जी शहरात कीटकनाशक फवारणी तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफस या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू केल्या आहेत. ‘ओरिएंटा त्सुत्सुगामुशी’ नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा आजार ‘माईट’ नावाच्या विशिष्ट कीटकाच्या चाव्यामुळे पसरतो.

या आजाराची तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे असून वेळेत उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी बाधित गावांमध्ये जलद ताप सर्वेक्षण, कीटक सर्वेक्षण आणि स्वच्छता मोहिमेची सुरूवात केली आहे. झुडपांमध्ये वास्तव्य करणाऱ्या माईटच्या नियंत्रणासाठी टेमीफॉस आणि मॅलीथिऑन पावडरचा वापर करून कीटकनाशक फवारणी केली जात आहे. तसेच वाढलेले गवत आणि अनावश्यक झुडपे तातडीने काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तात्काळ कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी केली आहे. वाढत्या डासांमुळे आणि झुडपांमधील माईटमुळे संसर्गाचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, खुल्या जागी शौचास जाणे टाळणे, घराच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि कीटकनाशक औषधांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button