बीड

संगमनेरमध्ये ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता; ठेकेदारावर गुन्हा दाखल

संगमनेरमध्ये ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता; ठेकेदारावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर:-संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कवटे मलकापूर आणि कर्जुले पठार येथील विविध दगडखाणींवरून प्रशासनाने मोठी कारवाई करत ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची मुक्तता केली आहे. यामध्ये २२ पुरुष व १६ महिला कामगारांचा समावेश असून, सर्व मुक्त कामगार पालघर जिल्ह्यातील आहेत.

या कारवाईसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे गुरुवारी सकाळी तक्रार प्राप्त होताच, त्वरित यंत्रणा सक्रिय करण्यात आली. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांद्वारे ही धडक मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेत सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधीही सहभागी होते. सर्व मुक्त कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना भोजन, बंधमुक्त प्रमाणपत्र व पालघरला पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणातील ठेकेदार राठोड याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायदा व वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्त झालेल्या कामगारांनी प्रशासनाचे आभार मानले असून, ही कारवाई सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

Back to top button