बीड

भगवानबाबांना आपलं म्हणा, बाबा तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाहीत – महंत नामदेव महाराज शास्त्री

भगवानबाबांना आपलं म्हणा, बाबा तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाहीत – महंत नामदेव महाराज शास्त्री
 पुरुषोत्तम मासनिमित्त अकोले गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
पाथर्डी (प्रतिनिधी): तालुक्यातील अकोले येथे ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी आधिकमास (पुरुषोत्तम मास) निमित्त आरंभीत केलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता झाली. काल्याच्या किर्तन प्रसंगी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी श्री संत भगवानबाबांच्या अनेक सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. शास्त्रीजी म्हणाले की, ६६ वर्षांपूर्वी ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी अकोले गावामध्ये सप्ताहाचा प्रारंभ करून याच गावामध्ये बाबांनी स्वतः काला केला. त्यामुळे अकोले हे गाव खरोखर भाग्यवान आहे. भगवानगडाची महती आणि व्यापकता सर्वदूर पसरल्यामुळे देशभरातून लोक आपल्या गडावर येतात. भगवानगडाच्या परिसरामध्ये एखाद्या गावामध्ये जर कोणी नवीन पाहुणा आला तर परिसरातील लोक भगवानगडावर चला म्हणण्याऐवजी स्वाभिमानाने आमच्या गडावर झाला असे म्हणतात. अर्थात भगवानगडाच्या भक्तांचा हा स्वाभिमान आहे. भगवानगड हीच आपली ओळख आहे. भाविकांच्या प्रतिसादामुळेच आज आपल्या गडाची महती जगभर पसरलेली आहे. भगवानगडावरील विद्यार्थ्यांना स्वतः श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा शिकवत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गडाचा विद्यार्थी म्हणजे जणू एक हिरा चमकत आहे असे वाटते. वीस वर्षांपूर्वीचा भगवानगड आणि आजचा भगवानगड यामध्ये खूप सुधारणा झालेली भक्तांना पहावयास मिळत आहे. याचे सर्व श्रेय शास्त्रीजी गडाच्या भक्तांना देतात. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सात दिवस ह.भ.प.भागवताचार्य श्री.प्रकाश महाराज साठे यांची श्रीमद भागवत कथा संपन्न झाली. सप्ताहामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आचार्य शिवाजी महाराज रायपुरे (बुलढाणा) यांनी सेवा दिली. तसेच सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे कीर्तनकारांची कीर्तनसेवा संपन्न झाल्या : शुक्रवार दि.२२/०५/२०२६ रोजी ह.भ.प.महत कृष्णा महाराज शास्त्री (उत्तराधिकारी श्रीक्षेत्र भगवानगड), शनिवार दि.२३/०५/२०२६ रोजी ह.भ.प. विनोदाचार्य विलास महाराज गेजगे (परभणी), रविवार दि.२४/०५/२०२६ रोजी ह.भ.प.सोपान महाराज शास्त्री (हिंगोली), सोमवार दि.२५/०५/२०२६ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर (आळंदी), मंगळवार दि.२६/०५/२०२६ रोजी ह.भ.प. विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), बुधवार दि.२७/०५/२०२६ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंढे (परळी), गुरुवार दि.२८/०५/२०२६ रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज शास्त्री (जगदंबा गड, कारेगाव), शुक्रवार दि.२९/०५/२०२६ रोजी सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प.डॉ. न्यायाचार्य गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री (श्रीक्षेत्र भगवानगड) यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.
Back to top button