बीड
हायवाने जिल्हा प्रशासन हायजॅक केले काय ? बहुजन समाज पार्टीची मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार !

हायवाने जिल्हा प्रशासन हायजॅक केले काय ?
बहुजन समाज पार्टीची मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार !
नांदेड (प्रतिनिधी) : बेधुंद अवस्थेत भरधाव धावणाऱ्या वाळू व माती वाहतूक करणाऱ्या हायवाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असल्याने अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, यामुळे या हायवाने जिल्हा प्रशासन हायजॅक केले की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून याची बहुजन समाज पार्टीने गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तक्रार केली आहे.
बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद व उमरी तालुक्यात खुले आम वाळू, मुरुम व मातीची तस्करी होत आहे. या अवैध वाहतुकीसाठी अधिकृत कमी व अनधिकृत जास्त हायवा, टिप्पर, आयशर, टेम्पो व ट्रकनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन, पोलीस आणि परिवहन विभागाने पूर्णतः डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
कांही दिवसांपूर्वीच सगरोळी येथे एका निष्पाप नागरिकाचा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने क्रूर बळी घेतला असून त्यांच्या प्रेताचा अग्नी विझतो की नाही तोच लगेच दुसरी भयंकर घटना देगलूरजवळ घडली आहे. पन्नास वर्षीय नागरिक प्रकाश मल्हारी सुर्यवंशी हे आपल्या मोटार सायकलने जात असताना समोरुन येणाऱ्या बेधुंद हायवाने बागनटाकळी या गावाजवळ जोराची धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून नांदेड येथील रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत आहेत. हायवाच्या या रक्तरंजित खेळाकडे जिल्हा शासन प्रशासन लक्ष देईल काय ?
या अवैध वाळू, मुरुम आणि माती वाहतुकीला लगाम घालण्यासाठी प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी शासनाने चेक पोस्ट उभारुन तेथून जाणाऱ्या सर्व वाहनांची नोंद घेऊन व कडक तपासणी करून अवैध वाहतुकीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नंबर प्लेट नसलेली व एकच नंबरची अनेक अवैध वाहने प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त करुन त्यांचे परवाने रद्द करावेत. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा प्रशासनास कडक कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या निवेदनातून केली आहे.
गंजगाव, बोळेगाव आदी ठिकाणी रात्रंदिवस अवैध वाळूचा उपसा सुरू असताना महसूल विभागाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने देखील या हायवाकडे डोळेझाक करुन अवैध व बेधुंद वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले की काय अशी शंका येत आहे. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याचे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे.
———+——-+———+– ——-+——
आरक्षण उपवर्गीकरण ही भाजपची चाल असून या पक्षात राहून विरोध ही नौटंकी – इंजि. देगलूरकर
नांदेड (प्रतिनिधी): आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे ही भारतीय जनता पक्षाची चाल असून या पक्षात राहून उपवर्गीकरणास विरोध करणे ही नौटंकी आहे. अशा ढोंगी लोकांनी अगोदर भाजपला सोडचिठ्ठी दिली पाहिजे असे मत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केले.
आरक्षण उपवर्गीकरणास विरोध करण्याची भूमिका कांही चर्मकार समाजाच्या नेत्यांनी मांडली आहे, याबाबत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केवळ नौटंकी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. गुरु रविदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीरामजी हे आपले आदर्श असून त्यांची विचारधारा पायदळी तुडवून जातीजातीत भांडणे लावणाऱ्या सनातनी धर्मांध राजकीय पक्षांची अगोदर साथ सोडावी व नंतरच आंबेडकरी समाजासोबत येऊन आरक्षणाचे खरेखुरे आंदोलन करावे, नुसती नौटंकी करु नये असे मत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणाचे उपवर्गीकरण हा भाजप सरकारने कळीचा मुद्दा बनविला असून चर्मकार समाजातील आपल्या कांही हस्तकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाताशी धरुन उपवर्गीकरणाचे समर्थन करायला लावले तर कांही जणांना विरोध करण्याची भूमिका दिली आहे. इतर प्रत्येक समाजातही असाच दुहेरी खेळ लावून देण्यात आला आहे. ही दुहेरी मानसिकता धोकादायक आहे. फोडा, झोडा आणि राज्य करा ही या शासनाची नीती आहे. उपवर्गीकरणच नाही तर शासनाच्या या दुष्ट नितीचाही विरोध झाला पाहिजे !
लोकसंख्येनुसार जनगणना करुन अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवावी, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, अनुसूचित जातीचा नोकऱ्यातील अनुशेष भरुन काढण्यात यावा, आजघडीला मरणासन्न अवस्थेत आलेल्या सर्व मागासवर्गीय महामंडळांना भरीव आर्थिक निधीची तरतूद करुन जीवदान देण्यात यावे इत्यादी मागण्याही शासनाकडे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने आम्ही मांडत असल्याची माहिती इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली.


