बीड

जामखेड नगर परिषदेत कर आकारणीचा महाघोळ? नागरिकांचा थेट आरोप

जामखेड नगर परिषदेत कर आकारणीचा महाघोळ? नागरिकांचा थेट आरोप

सर्व्हे चुकीचा, कर आकारणी कशी बरोबर?

जामखेड: जामखेड नगरपरिषदेच्या सन २०२६ च्या वार्षिक कर आकारणीसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्याचा आरोप करत नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्या नावे नगरपरिषद कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

मालमत्ता धारकांची नावे चुकीची नोंदविणे, कर आकारणीत विसंगती निर्माण होणे तसेच सर्व्हेक्षण प्रक्रियेत अनेक चुका झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वार्षिक कर आकारणीसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून अनेक मालमत्ताधारकांची नावे चुकीची नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना चुकीच्या कर आकारणीचा फटका बसत असून याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्व्हेचे काम करणारे पंकज चव्हाण यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात अनेक चुका झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सर्व्हेक्षणातील त्रुटी दुरुस्त होईपर्यंत चुकीच्या कराची वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर विकास राऊत,रावसाहेब दांडगे, हसन सय्यद, उदय दाहितोंडे, अमीर मणेरी, प्रशांत राळेभात, विरुपाक्षाप्पा हुनगुंद, राजेंद्र पोकळे, दत्ता खेत्रे, सागर भोसले, गणेश घोरपडे, डॉ. कासम शेख, अंकुश दहिकर, राजेंद्र सांगळे आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

नगरपरिषद प्रशासन या निवेदनावर काय निर्णय घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी कशी करते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

चौकट
—————————————–
सुविधा नाहीत, तरी भरमसाठ कर आकारणी; प्रदीप टाफरे

जामखेड नगरपरिषदेकडे स्वतःची एकही शाळा नाही. नगरपरिषद हद्दीत सात गावे जोडलेली असली तरी नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. रोजगार हमी योजनेसारख्या योजना नगरपरिषदेकडे नाहीत. असे असताना नागरिकांवर भरमसाठ कर आकारणी केली जात आहे. कर वाढीबाबत विचारणा केल्यास ‘पूर्वीच्या बॉडीने ठराव केला आहे’ असे उत्तर दिले जाते. कोणताही ठराव करायचा आणि त्याचा भुर्दंड मात्र जनतेने सहन करायचा, ही बाब योग्य नाही. कर आकारणीतील त्रुटींची चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा.

— प्रदीप टाफरे
तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), जामखेड

Back to top button