महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी शहरात डासांचा वाढता त्रास; औषध फवारणीसाठी नगरपरिषदेला निवेदन

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

अंजनगाव सुर्जी : शहरामध्ये वाढत्या डासांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून तात्काळ औषध फवारणी व फॉगिंग मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात लोकजागर संघटना व पतंजली परिवार यांच्या वतीने नगरपरिषद अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंजनगाव सुर्जी शहरातील विविध भागांमध्ये साचलेले पाणी, अस्वच्छता आणि नियमित औषध फवारणीचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती वाढत आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शहरातील अनेक भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

या संदर्भात यापूर्वीही अनेक नागरिक, सामाजिक संघटना तसेच काही राजकीय पक्षांनी नगरपरिषदेकडे निवेदने व तक्रारी सादर केल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात नियमितपणे दर महिन्याला डास निर्मूलनासाठी औषध फवारणी (फॉगिंग) होणे आवश्यक आहे. मात्र मागील सुमारे एक वर्षापासून शहरातील कोणत्याही भागात नियमित फवारणी झालेली नसल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे.

डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत संपूर्ण शहरात डास नियंत्रणासाठी औषध फवारणी व फॉगिंग मोहीम राबवावी, तसेच नाल्यांची साफसफाई करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा नाईलाजास्तव नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

यावेळी लोकजागर संघटना व पतंजली परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

Back to top button