रत्नागिरी

कुडुक बुद्रुकमधील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, आरोग्य विभाग व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

कुडुक बुद्रुकमधील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, आरोग्य विभाग व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

मंडणगड : प्रतिनिधी, दि. 12 – मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक या गावातील एका गर्भवती महिलेचा अधिक उपचाराकरिता जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील आरोग्य विभाग व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील कुडूक बुद्रुक या गावातील विधी संदेश सावणेकर (वय 32) या सात ते आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हारे येथे उपचाराकरिता आणले, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात या महिलेची प्रकृती आणखीनच अत्यवस्थ बनली. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचाराकरिता दापोली येथील उपजिल्हारुग्णालयात त्या निघाल्या, मात्र ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. 108 हि रुग्णवाहिका कॉल साठी अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. तर 102 ही रुग्णवाहिका रुग्णालयात असतानाही विविध कारणांनी उपलब्ध झाली नाही. नाईलाजाने या महिलेच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन उपजिल्हारुग्णालय दापोली गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रवासादरम्यान या महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.
तालुक्यातील या घटनेनंतर, सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध असूनही यावेळी आरोग्य व्यवस्थापनाकडून रुग्णवाहिका का उपलब्ध करण्यात आली नाही. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अत्यावश्यक सुविधेकरिता रुग्णवाहिकेची सेवा आवश्यक असताना केवळ रुग्णवाहिकेमुळे या महिलेच्या पुढील उपचारासाठी विलंब झाला होता. या संदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथील वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button