लामगव्हाणमध्ये अंगावर जीप घालून खूनाचा प्रयत्न; मुख्य आरोपी १४ दिवसांपासून फरार

लामगव्हाणमध्ये अंगावर जीप घालून खूनाचा प्रयत्न; मुख्य आरोपी १४ दिवसांपासून फरार
शुल्लक वादातून थरारक घटना; गंभीर जखमीच्या जबाबावरून बाप-लेकांविरुद्ध गुन्हा
पैठण / प्रतिनिधी
गुढी पाडव्याच्या दिवशी घडलेल्या थरारक घटनेत लामगव्हाण- जोगेश्वरी (ता. पैठण) येथे एका व्यक्तीच्या अंगावर बोलेरो जीप घालून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.घटनेला तब्बल १४ दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेत मोतीराम रामराव जाधव (वय ६२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत.त्यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात बद्रीनाथ मुरलीधर जाधव व त्यांचा मुलगा विवेक बद्रीनाथ जाधव या बाप-लेकांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी दुपारी मोतीराम जाधव यांच्या मुलाचा आणि विवेक जाधव यांचा शेतात किरकोळ वाद झाला होता.हा वाद तेव्हाच मिटला असला तरी सायंकाळी सूडाच्या भावनेतून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोतीराम जाधव हे गावातील किराणा दुकानाजवळ उभे असताना विवेक जाधव याने (एमएच १६ एटी ४७१९) क्रमांकाची बोलेरो भरधाव वेगाने चालवत त्यांच्या अंगावर घातली.या भीषण धडकेत जाधव यांना सुमारे ८० फूट फरपटत नेण्यात आले,ज्यामुळे ते अत्यंत गंभीर जखमी झाले.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फौजदार मंजितसिंग सेना,अमोल मगर,संदीप धनेधर आदींचे पथक तपास करत आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी आरोपी बद्रीनाथ जाधव याला अटक करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी विवेक जाधव हा अद्यापही फरार असून पोलिसांना चकवा देत आहे.त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके परजिल्ह्यातही धाडण्यात आली आहेत. “लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल,” असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी व्यक्त केला.दरम्यान, गुढी पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
“१४ दिवस उलटूनही आरोपी मोकाट; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह”
घटनेनंतरही मुख्य आरोपी अटकेत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “अशा प्रकारे आरोपी मोकाट फिरत असतील तर गुन्हेगारीला आळा कसा बसणार?” असा संतप्त सवाल जखमी मोतीराम जाधव यांनी उपस्थित केला आहे.



