बीड
अत्याचार पीडितांचा मोठा दिलासा; दिवंगत सदस्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरी!

अत्याचार पीडितांचा मोठा दिलासा; दिवंगत सदस्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरी!
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा :- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार, अशा प्रकरणांमध्ये दिवंगत सदस्याच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला गट-क किंवा गट-ड संवर्गातील शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे अचानक आलेला मानसिक व आर्थिक आघात कमी होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. योजनेमुळे कुटुंबावर अचानक येणारा आर्थिक आणि मानसिक आघात कमी होईल, तसेच कमावत्या सदस्याच्या निधनानंतर निर्माण होणारी आर्थिक असुरक्षितता कमी करण्यास मदत होईल.
भंडारा जिल्ह्यातील पात्र कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रे डिसेंबर 2025 अखेरपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा कार्यालयात सादर करावीत.
नियुक्ती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समिती प्रकरणांची छाननी करेल. समिती दिवंगत व्यक्तीवरील गुन्हा, कुटुंबाची परिस्थिती आणि पात्रतेच्या निकषांची तपासणी करून शिफारस समाज कल्याण विभागाकडे सादर करेल.
समाज कल्याण विभाग व आदिवासी विभाग संयुक्तपणे उपलब्ध रिक्त पदांचा विचार करून पात्र ठरलेल्या वारसास नोकरी देण्याचा निर्णय घेतील. नियुक्तीस अंतिम मंजुरी समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना राहणार आहे.
शासनाने सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले असून, सर्व प्रलंबित नियुक्ती प्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी भंडारा जिल्ह्यातील पात्र कुटुंबीयांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आशा कवाडे, सहायक आयुक्त समाज कल्याण, भंडारा यांनी सांगितले.


