१०८ शिवलिंगांचे दर्शन आणि महायज्ञ; महाशिवरात्रीला हंतोडा येथे भक्तांचा मेळा

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी: तालुक्यातील हंतोडा येथील सिद्ध कृपाश्रमात यंदा महाशिवरात्रीनिमित्त १०८ शिवलिंगांच्या दर्शनाचा भव्य आणि दिव्य सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. दि. १५ व १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक विधी, अभिषेक, महायज्ञ, पालखी सोहळा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देश-विदेशातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
◾स्थापना व आध्यात्मिक परंपरा
सन १९९९ मध्ये परमपूज्य स्वामी हरिदासजी महाराज यांच्या प्रेरणेने सिद्ध कृपाश्रमाची स्थापना झाली. प्रारंभी येथे सिद्ध महामृत्युंजय मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन २००४ मध्ये स्वामी हरिदासजींच्या जन्मस्थानापासून ते हंतोडा येथील आश्रमापर्यंत भव्य मिरवणूक काढत १०८ शिवलिंगांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यास देश-विदेशातील असंख्य भाविक उपस्थित होते.
आश्रम परिसरात १२ फूट उंच सिद्धेश्वर मूर्ती, १०८ सिद्ध शिवलिंग, सिद्ध शनिदेव मंदिर, सिद्धेश्वर सिद्धपरंपरा मंदिर, सिद्ध शिव मंदिर, गजानन महाराज मंदिर तसेच नवनाथ मंदिर अशी विविध देवस्थाने एकाच ठिकाणी असल्याने हे स्थळ धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे ‘सिद्ध पितृमुक्ती महायज्ञ’ यांसारखे उपक्रमही नियमितपणे आयोजित केले जातात.
स्वामी हरिदासजींचे ध्येय सर्वांना आरोग्य, सुख, शांती, समृद्धी व आध्यात्मिक उन्नती मिळावी हे असून आश्रमात विशेष सिद्ध पद्धतीने साधना, पूजन व विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. संस्था समितीमार्फत भाविकांना साधना व उपक्रमांविषयी मार्गदर्शन व सहकार्य केले जाते.
◾महाशिवरात्री भव्य कार्यक्रमाचे वेळापत्रक
रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० वाजता श्री गणेश पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ होईल. त्यानंतर ६.३० ते ७.०० या वेळेत सिद्ध महामृत्युंजय अभिषेक पार पडेल. सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत देवी-देवतांचे पूजन करण्यात येईल.
सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत १०८ शिवलिंगांचा अभिषेक व पालखी सोहळा होणार आहे. सकाळी ९.०० ते ९.३० या वेळेत सिद्ध कृपेश्वर पूजा व आरती, तर ९.३० ते १०.०० या वेळेत सिद्ध परंपरा मंदिरात पूजा-प्रार्थना होईल.
सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत सिद्ध सिद्धेश्वर महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ नंतर फराळ व चहा-पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १ नंतर भजन कार्यक्रमाचे आयोजन धिरज जयरवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारी २ नंतर सिद्ध कार्याविषयी माहिती व प्रशिक्षण सत्र होणार असून दीक्षा सिद्धार्थ व चोळके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भक्तांना घेता येईल.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६
सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत सिद्ध मंदिर ते खैरी दोनोडा (श्री ज्ञानेश्वरराव गाडे) येथे पालखी सोहळा पार पडेल. सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत खैरी दोनोडा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
◾व्यवस्थापन व आवाहन
या संपूर्ण महोत्सवाचे मार्गदर्शन अध्यक्ष स्वामी हरिदास फाउंडेशन, वडगाव शेरी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून आयोजन सिद्ध कृपाश्रम हंतोडा व्यवस्थापक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६७३९८५१३ व ९३७३६८०२९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १०८ शिवलिंगांचे दर्शन, अभिषेक व महायज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रम व्यवस्थापन समितीने केले आहे. हंतोडा परिसर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने नटणार असून श्रद्धा, साधना आणि आध्यात्मिक उन्नतीचा अद्वितीय अनुभव भाविकांना येथे मिळणार आहे. ही माहिती हंतोडा येथील सिध्दकृपाश्रम समितीचे विजय निर्मळ यांच्या कडुन प्राप्त झाली.



