बीड

वडवलीत जलक्रांतीचा ऐतिहासिक प्रारंभ! ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

वडवलीत जलक्रांतीचा ऐतिहासिक प्रारंभ! ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

• श्रमदानातून साकारला जलसंधारणाचा आदर्श • शेती, पिण्याच्या पाण्यासाठी व वन्यजीव प्राण्यांसाठी  ठरणार जीवनदायी उपक्रम
श्रीवर्धन (संदेश घोलप):श्रीवर्धन तालुक्यातील वडवली ग्रामपंचायतीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावातील शेकडो ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत भव्य वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि सामाजिक जबाबदारीचा हा अनोखा नमुना परिसरासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वडवली गावासाठी हा वनराई बंधारा मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे, विहिरींना पाणीपुरवठा सुधारणे आणि शेतीसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे बंधारे ग्रामीण भागात कमी खर्चात प्रभावी जलव्यवस्थापनाचे उत्तम साधन ठरतात.
या श्रमदान मोहिमेत युवक, महिला बचत गट, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळपासूनच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. पोती भरणे, रचणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रीत करणे अशा विविध कामांमध्ये सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदविला. गावात उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.
पंचायत समिती श्रीवर्धनचे विस्तार अधिकारी किशोर नागे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे मार्गदर्शन केले.
“वनराई बंधारा हा केवळ पाणी अडवण्याचा उपाय नसून भविष्यातील पाणी सुरक्षेची हमी आहे. ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट इतर गावांसाठी आदर्श ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
संत निरंकारी सत्संगचे प्रमुख गणेश नाकती यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीला पूरक वातावरण निर्माण होईल. तसंच गावात हरित उपक्रमांना चालना मिळणार आहे. ग्रामसभेत भविष्यात आणखी जलसंधारण प्रकल्प राबविण्याचा संकल्पही करण्यात आला.
ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेला हा वनराई बंधारा केवळ जलसंधारणाचा प्रकल्प नसून गावाच्या विकासाची, एकतेची आणि स्वयंस्फूर्तीची जिवंत साक्ष ठरला आहे. वडवलीतून सुरू झालेली ही जलक्रांती परिसरातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Back to top button