📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

चैत्यभूमी येथे धर्मांतरित बौद्धांसाठी विशेष श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

चैत्यभूमी येथे धर्मांतरित बौद्धांसाठी विशेष श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन; संविधान व समतेच्या रक्षणासाठी एकजुटीचे आवाहन
बीड  | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदू धर्मातील विषमतावादी परंपरांना नाकारत बौद्ध धम्म स्वीकारलेल्या ओबीसी, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी आदी समाजातील धर्मांतरित बौद्धांसाठी आयोजित विशेष श्रामणेर/बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी चैत्यभूमी, दादर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते या दहा दिवसीय शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २० धर्मांतरित बौद्ध युवक-युवती सहभागी झाले आहेत. बीड, जालना, नांदेड, परभणी, रायगड, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील सहभागी या शिबिरात बौद्ध धम्माचे सखोल प्रशिक्षण घेत आहेत.
उद्घाटनप्रसंगी ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांनी संविधान आणि समतेच्या मूल्यांच्या रक्षणासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली. धर्मांतरित बौद्धांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करत, “महार-बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न धर्मांतरविरोधी आणि संविधानविरोधी शक्तींकडून होत आहेत. मात्र, समाजाने एकसंघ राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची चळवळ अधिक बळकट करावी,” असे आवाहन केले.
पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी शिबिरार्थींना श्रामणेर प्रवज्या दिली असून ते शिबिराचे संघनायक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय शिक्षक व महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष (संस्कार) विजय कांबळे हे पूर्णवेळ सहसंघनायक म्हणून दहा दिवस शिबिराचे संचालन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड. डॉ. एस. एस. वानखडे होते. सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सचिव अनिल मनोहर यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, स्वातीताई शिंदे, प्रदीप कांबळे, सुषमाताई पवार, डॉ. राजेश पवार, अशोक केदारे, प्रशांत गडकरी, विलास वानखडे, दयानंद बडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी राजगृह येथे जाऊन आद. मनिषाताई आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Back to top button