बीड

पायी लॉंग मार्चची २६ जूनला चैत्यभूमीवर सांगता आंबेडकरवादी युवकांनी सरकारला ताकद दाखवून द्यावी

पायी लॉंग मार्चची २६ जूनला चैत्यभूमीवर सांगता

आंबेडकरवादी युवकांनी सरकारला ताकद दाखवून द्यावी

बीड/प्रतिनिधी
अनुसूचित जातींमध्ये अबकड उपवर्गीकरण करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करत त्याविरोधात बीड ते मुंबई असा भव्य पायी लॉंग मार्च काढण्यात आला आहे. सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि अनुसूचित जातींची एकता अबाधित ठेवण्यासाठी हा मार्च आयोजित करण्यात आला असून, १० जून रोजी बीड येथून सुरू झालेला हा मार्च २६ जून रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे पोहोचणार आहे. या पायी लॉंग मार्चमध्ये राज्यभरातील आंबेडकरवादी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी हजारो पावले मुंबईच्या दिशेने निघाली आहेत.अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे कोणतेही उपवर्गीकरण स्वीकारले जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. आंबेडकरवादी युवक किरण वाघमारे, ॲड. राजेश शिंदे, प्रविण टाकणखार आणि रजनिकांत वाघमारे यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, हा लढा केवळ आरक्षणाचा नसून सामाजिक एकता, संविधानिक अधिकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण करण्याचा आहे. त्यामुळे २६ जून रोजी चैत्यभूमी येथे होणाऱ्या या ऐतिहासिक मार्चच्या समारोप प्रसंगी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी. मुंबईतील चैत्यभूमीवर पोहोचणारा हा मार्च अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधातील जनभावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरणार असून, राज्यभरातील आंबेडकरवादी समाजाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. आंदोलनाच्या सांगता कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.

Back to top button