जनसुरक्षा विधेयक मागे घ्या ;वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा!

जनसुरक्षा विधेयक मागे घ्या ;वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा!
सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या मुळावर घाव घातला – ॲड डॉ अरुण जाधव
जामखेड (प्रतिनिधी) –राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल दिनांक ११ जुलै २०२५ रोजी मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अँड. डॉ. अरुण जाधव यांनी या कायद्याला विरोध दर्शवत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्व संबंधित आमदारांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. जाधव म्हणाले,जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे. हा कायदा जनतेच्या हक्कांवर गदा आणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालतो. त्यामुळे आम्ही या विधेयकाचा तीव्र निषेध करतो.
पुढे बोलताना ॲड.डाॅ.जाधव सरकारवर निशाणा साधत म्हटले की,हा कायदा संमत करून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या मुळावर घाव घातला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळातील काँग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या आमदारांनी जनतेच्या हिताच्या विरोधात जाऊन हे पाऊल उचलले आहे का ? आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यभर या आंदोलनाची हाक देण्यात येणार असून, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशाराही ॲड डॉ.जाधव यांनी दिला आहे.
*चौकट*
सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सरकारी कर्मचारी यापैकी कोणालाही शासनाच्या विरोधात आंदोलन, मोर्चा,संप ,भाषण करता येणार नाही.शासनाने कुठलाही निर्णय घेतला तर तो निर्णय लोकांच्या हिताचा नसेल तर विरोध करता येणार नाही,न विचारपूस करता जेलमध्ये टाकण्यात येईल.
– ॲड डॉ.अरुण जाधव
राज्य प्रवक्ते – वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य



