न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
जामखेड प्रतिनिधी – दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड तालुक्यातील राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत विशेष सजवलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत लेझीम पथकासह करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत राजुरीच्या सरपंच सौ. अश्विनी सागर कोल्हे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब माने, शिक्षणप्रेमी रामभाऊ कोल्हे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पिसाळ, ज्येष्ठ शिक्षक श्री. राजेंद्र पवार, श्री. सुभाष बोराटे, श्री. विजय क्षीरसागर, श्री. अक्षय मोहिते, श्री. उमराव लटपटे, श्री. हनुमान राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसेच मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शेतकरी मित्र श्री. मिलिंद बिचकुले व श्री. सुनील चौधरी यांनी स्वतःच्या सजवलेल्या बैलगाड्या शाळेला उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले.
या वेळी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत लापशी, सांबर भात व मिठाईचे जेवण देण्यात आले. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत परतताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी हास्य पाहण्यासारखे होते. दिवसभर नवागत विद्यार्थ्यांनी शाळेत आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. विजय क्षीरसागर सर यांनी केले, तर श्री. सुभाष बोराटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा उत्साही वातावरणात न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



