बीड

शासनाच्या योजनांपासून कुणीही वंचित राहणार नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

शासनाच्या योजनांपासून कुणीही वंचित राहणार नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

महाराजस्व समाधान शिबिरात १८ विभागांच्या योजनांचे वितरण

जामखेड प्रतिनिधी: महसूल व वन विभाग, तहसील कार्यालय जामखेड यांच्या वतीने खर्डा रोडवरील जगदंबा लॉन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, मुख्याधिकारी अजय साळवे, मंडल अधिकारी प्रशांत माने, पंचायत समिती बालविकास अधिकारी सानप, पशुसंवर्धन अधिकारी दत्ता मोटेगावकर, तलाठी आनंद कोकाटे, जामखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, भाजपा शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, गटनेते तात्याराम पोकळे,नगरसेविका संगिता भालेराव, नगरसेवक प्रवीण चोरडिया,नय्युम सुभेदार, राहुल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये उपस्थित मान्यवरांचा महसूल व वन विभाग, तहसील कार्यालय जामखेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण विकास केंद्र संस्थेने लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी करून घेतले होते. विविध विभागांच्या एकूण १८ योजनांचे लाभ वितरण यावेळी करण्यात आले. शिबिरास सुमारे ५०० महिला व पुरुष उपस्थित होते. विशेषतः जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील जाती-जमातींना मोठ्या प्रमाणावर विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

या शिबिरात जात प्रमाणपत्रांचे वाटप, भटके विमुक्त समाजातील कलाकार व कलावंतांना सहाय्य, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, विशेष सहाय्य विभागांतर्गत निराधार व्यक्तींना लाभ वितरण, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत, नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधन नुकसान अनुदान, स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वारसांना लाभ, कृषी विभागाच्या योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, पंचायत समितीच्या विशेष घटक योजना, मुक्त संचार गोठा योजना, नगरपरिषदेच्या घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), बेबी केअर किट वाटप, ‘लेक लाडकी’ योजना, महिला व बालविकास विभागाच्या योजना, दिव्यांगांसाठी युनिक आयडी वाटप तसेच मळणी यंत्र व फवारणी यंत्रांचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या विविध विभागांच्या योजना एका छताखाली उपलब्ध करून देत लाभार्थ्यांना थेट मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरण करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात म्हणाले, जातीच्या दाखल्यावाचून कोणताही नागरिक वंचित राहू नये. शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आजचे शिबिर हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या योजनांचा लाभ घ्यावा.

ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, भटके विमुक्त समाजापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार असून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही.

कार्यक्रमास तहसील कार्यालय जामखेडचे कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेख आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या समन्वयिका रेश्मा बागवान, उर्मिला कवडे, ललिता पवार, सागर कांबळे, ऋषिकेश गायकवाड, वैशाली जाधव, भक्ती पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button