बीड
चंपावती महोत्सवाच्या रांगोळी स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास जिवंत; 115 शाळांमधील हजारो बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग!

चंपावती महोत्सवाच्या रांगोळी स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास जिवंत; 115 शाळांमधील हजारो बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग!
*बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देणे, हेच आमचे ध्येय- अनिल दादा जगताप*
बीड, प्रतिनिधी – बीड जिल्ह्याच्या कलाक्षेत्रात मानबिंदू ठरलेली सांस्कृतिक चळवळ अनिल दादा जगताप फाउंडेशन बीड आणि शिवसेना बीड आयोजित चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकरंडक अंतर्गत सामूहिक रांगोळी स्पर्धा काल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून, ग्रामीण भागातील गाव-खेड्यांतून तब्बल ११५ शाळांमधील हजारो बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रांगोळी स्पर्धेसाठी “छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले” हा विषय देण्यात आला होता. बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले विविध कल्पक स्वरूपात रांगोळीच्या माध्यमातून साकारले. रंग, रचना आणि सर्जनशीलतेच्या जोरावर बालकलाकारांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत अद्भुत असा कलाविष्कार सादर केला.
चंपावती महोत्सवातील रांगोळीची ही दुसरी स्पर्धा सलग दुसऱ्या दिवशीही बालकलाकारांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडली. प्रत्येक रांगोळीतून इतिहास, संस्कृती आणि बालमनातील कल्पनाशक्तीचे सुंदर दर्शन घडले.
या उल्लेखनीय सहभागाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी सर्व बालकलाकारांचे विशेष कौतुक करत त्यांचे आणि सहभागी सर्व शाळांचे अभिनंदन केले. तसेच बीड जिल्ह्यातील बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देणे, हेच आमचे ध्येय असल्याचे मत अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दि. ४ फेब्रुवारी ते दि. १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत संपन्न होणार असल्याची माहिती अनिल दादा जगताप फाउंडेशनचे सचिव आकाश भैया जगताप आणि चंपावती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी दिली.
चंपावती महोत्सवाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील बालकलाकारांना व्यासपीठ मिळत असून, सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि पुढील पिढी घडवण्याची ही चळवळ अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
•••••



