बीड
पहिल्या फेरीत १ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मिळाले आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग अपयशी बोगस प्रवेशा संदर्भात सक्षम पुरावे ; तरीही शिक्षण विभागाकडून कारवाई नाही – मनोज जाधव

पहिल्या फेरीत १ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मिळाले आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश
बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग अपयशी
बोगस प्रवेशा संदर्भात सक्षम पुरावे ; तरीही शिक्षण विभागाकडून कारवाई नाही – मनोज जाधव
बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार, सोमवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात १ हजार ५७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये २ हजार २३५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ५ हजार ७८१ अर्ज आले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे २ हजार १८३ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले होते. त्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशफेरी सुरू करण्यात आली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत १ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहेत. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.
चौकट: –
बोगस प्रवेशा संदर्भात सक्षम पुरावे ; तरीही शिक्षण विभागाकडून कारवाई नाही – मनोज जाधव
सुरू असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रिये बाबत मनोज जाधव यांनी २७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या बोगस प्रवेशाबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर शिक्षणाधिकारी यांनी २८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीच्या संदर्भाने चौकशी समिती नेमून बोगस प्रवेशा संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जाणीवपूर्वक समिती नेमण्यास उशीर करण्यात आला ७ मार्च रोजी त्रि सदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले मात्र चौकशी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून निरुत्साह दाखवण्यात आला त्यामुळे शिक्षण विभागांनी किती बोगस प्रवेश रद्द केले हे मात्र कळू शकले नाही. मात्र आपल्याकडे बोगस प्रवेशाबाबत सक्षम पुरावे असून शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास आपण ते पुरावे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक यांच्याकडे सादर करणार असल्याचे शिवसंग्राम चे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हटले आहे.
*बोगस प्रवेशाची कारणे*
१)निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी सादर केलेले कागदपत्र हे पाहता क्षणी बनावट असल्याचे लक्षात येते मात्र निवड समितीतील कर्मचाऱ्यांनी त्याची सखोल तपासणी केली नाही.
२)प्रवेश मिळण्याचे मुख्य मापदंड हे गुगल मॅप वरील अँड्रेस लोकेशन हे आहे. ते तपासणे गरजेचे होते मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
३)बनावट आधार कार्ड मोठ्या प्रमाणात सादर केले आहेत. या आधार कार्डची खातरजमा करणे गरजेचे होते. मात्र कसल्याही प्रकारची चौकशी न करता प्रवेश दिले गेले.
४)बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या संशयित पालकांच्या घरी कर्मचाऱ्यांनी प्रवेश देण्याआधीच भेट देणे गरजेचे होते मात्र तसेच झाले नाही.



