बीड
संघर्ष वाघमारे प्रकरणी कुटुंबीयांना मारहाण व धमकी एन.सी.आर दाखल ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने पोलिसांकडे कारवाईची मागणी -नितीन सोनवणे

संघर्ष वाघमारे प्रकरणी कुटुंबीयांना मारहाण व धमकी एन.सी.आर दाखल ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने पोलिसांकडे कारवाईची मागणी -नितीन सोनवणे
बीड : शहरातील पेठ बीड परिसरातील रमाई चौक येथे गणपती उत्सवाच्या ठिकाणी घडलेल्या कथित घटनेनंतर १२ वर्षीय संघर्ष वाघमारे याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर संघर्षच्या आई व आजीलाही मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०२६ रोजी एनसीआर क्रमांक ०५६१ दाखल करण्यात आली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीसमोर ठेवलेल्या घटाला संघर्षचा हात लागल्याने तो खाली पडला. त्यानंतर तेथे उपस्थित काही मुलांनी संघर्षला मारहाण केली. एका महिलेनेही त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची विचारपूस करण्यासाठी संघर्षची आजी लता भालेराव घटनास्थळी गेल्या असता त्यांनाही तसेच संघर्षच्या आईलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे सहा वाजता संघर्षच्या घरी जाऊन दोन महिलांनी त्याच्या आईला मारहाण केली, घराच्या दरवाजावर दगड मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ‘तुझी मुलगी शाळेत कशी जाते ते मी बघते,’ अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वाघमारे कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली. यानंतर त्यांनी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून प्रकरणाची माहिती दिली. कुटुंबीयांच्या सुरक्षेसह कथित मारहाण, दगडफेक व धमकीच्या प्रकाराची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अल्पवयीन संघर्ष वाघमारे, त्याची आई व आजी यांना झालेल्या कथित मारहाणीची दखल घ्यावी, घरावर दगडफेक व दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नाबाबत उपलब्ध पुरावे तपासावेत तसेच कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली आहे.
दरम्यान, बौद्ध व मातंग समाजातील नागरिकांनी कोणत्याही घटनेवरून परस्परांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी कृती न करता कायदेशीर व शांततामय मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहनही नितीन सोनवणे व संघटनेने केले आहे.



