बीड
मजूर कष्टकरी लाडकी बहिण योजनेपासून वंचीत, ऊसतोड व स्थलांतरीत महिला परतल्याने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला एक संधी द्यावी- फयाजभाई शेख

मजूर कष्टकरी लाडकी बहिण योजनेपासून वंचीत,
ऊसतोड व स्थलांतरीत महिला परतल्याने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला एक संधी द्यावी- फयाजभाई शेख
शिरूरकासार (प्रतिनिधी)- शासनाची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले होते. योजनेच्या निकषामध्ये लाभार्थी बसत नाहीत त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा करिता अनेकवेळा सरकार द्वारे आवाहन करण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही, म्हणून सरकार मार्फत ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी eKyc प्रणालीचा पर्याय अवलंबण्यात आला. ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत, दरम्यान पात्र राज्यातील ऊसतोड करणाऱ्या महिला, मजुरी करणाऱ्या महिला बहिणी या स्थलांतरित झाल्या होत्या, त्या ekyc करू शकल्या नाहीत. पती- पत्नी दोघांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारखान्यावर मजुरीवर गेलेल्या हजारो मजूर बहिणी या ekyc प्रक्रीये पासून वंचीत राहिल्या आहेत. परिणामी त्यांना मिळणारा १५०० रुपयांचा लाभ बंद झाला आहे ज्याच्या त्या सर्वात जास्त हकदार आहेत.
मजूर कष्टकरी लाडकी बहिण ऊसतोड व स्थलांतरीत महिला आपल्या गावात परतल्याने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला एक संधी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फयाजभाई शेख यांनी महिला व बाल विकास विभागाला इ-मेल व निवेदना द्वारे केली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने लाडक्या बहिणींसह रस्त्यावर उतरण्याचा इशाराही फयाजभाई शेख यांनी दिला आहे.



