बीड
बोगस मोहगनी कुशल बिलाची रक्कम कोटी मध्ये ; तपासणी पथक नावालाच

बोगस मोहगनी कुशल बिलाची रक्कम कोटी मध्ये ; तपासणी पथक नावालाच
गेवराई पंचायत समिती मध्ये सावळा गोंधळ थांबता थांबेना
दैनिक सूर्योदयचा इफेक्ट गटविकास अधिकारी यांची तडका फडकी बदली
गेवराई :-मोहगनीचे कुशल बील लाभार्थ्यांच्या खात्यात ऑनलाइन जमा झाल्यावर गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना जाग आली आणि त्यांनी गावोगावी बँकेत जाऊन लाभार्थ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा लावला.परंतु कुशल बिलावर डोळेझाकून सह्या करतांना मोहगनी लागवड झाली की नाही ते पाहण्याची तसदि त्यांनी घेतली का? याप्रकरणात त्यांनी किती टक्केवारी घेतली का? त्यांनाच माहीते कारण नरेगाच्या प्रत्येक कामात कुशल बील काढण्यासाठी टक्केवारी ठरलेली असल्याचे बोलले जात असून बील ऑनलाइन जमा झाल्यावर तक्रारी आल्यानंतर प्रकरण आपल्या अंगलट येणार असे दिसताच त्यांनी तपासणी पथक तयार करून बाजू ढकलण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंत पोहचले असल्याने त्यांना काहीच करता आले नाही आणि यामध्ये सरळ सरळ त्या समोर आल्या. माजी मंत्री बदामराव आबा पंडित यांनी वेळोवेळी पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सामान्य जनतेच्या कामाला जर अडचणी आणल्या तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला होता.परंतु या कार्यालयाचा सावळा गोंधळ थांबता थांबत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन गटविकास अधिकारी यांना बदलण्याचे संकेत दिल्याने नवीन गटविकास अधिकारी हे कारभार सुरळीत चालवतील अशी चर्चा पंचायत समिती आवारात आणि तालुक्यात होत आहे.
गेवराई पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण जनतेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून ग्रामीण भागातील जनतेला,शेतकरी वर्गाला,वंचित,गरजू,गरीब कुटुंबांना विविध सरकारी योजना देण्याचे काम करते.याठिकाणहून प्रत्येक जाती धर्मातील बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल योजना राबवली जाते,शेतकऱ्यांना विविध योजना दिल्या जातात,हे कार्यालय ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू मानले जाते परंतु गेवराई पंचायत समिती ही या सर्वांना अपवाद ठरत असून या ठिकाणी अनेक योजना भ्रष्टाचार,बोगस कामे,सामान्य जनतेचे हाल हेच होत आले आहे आणि होत आहे.सध्या जिल्ह्यात मोहगनी वृक्ष लागवड करण्यात गाजले असून दैनिक सूर्योदय ने याविषयी बातम्यांतून सत्य लिखाण छापल्याने जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती गेवराई याठिकाणी भेट देऊन पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेतला याच वेळी माजी मंत्री बदामराव आबा पंडित यांनी ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर पंचायत समितीच्या कारभारा बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली .त्यामुळे सी ओ यांनी ठोस भूमिका घेऊन गटविकास अधिकारी यांची तडका फडकी बदली करून याठिकाणी अनिरुद्ध सानप यांची गटविकास अधिकारी म्हणून नियुकी केल्याने आता पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालेल अशी चर्चा पंचायत समितीच्या आवारात होत असून दैनिक सूर्योदय च्या परखड लिखाणाची चर्चा होत आहे.



