📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई;आंतरराज्यीय टोळी गजाआड 

जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई;आंतरराज्यीय टोळी गजाआड
बनावट सोने विक्री करणाऱ्या तिघांना अटक
जामखेड | प्रतिनिधी:-बनावट सोने खरे असल्याचा भास निर्माण करून विक्रीच्या उद्देशाने आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जामखेड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. व्यापाऱ्याची सतर्कता, गुप्त बातमीदाराची माहिती आणि पोलिसांची वेळीच कारवाई यामुळे मोठी फसवणूक टळली आहे.
पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड शहरातील प्रसिद्ध कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे, रा. जामखेड यांच्या कापड दुकानात अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी), वय २४ वर्षे, रा. धानसा, ता. भिनमाल, राज्य राजस्थान व त्याच्यासोबत असलेला आरोपी मोहनलाल बालाजी बागरी, वय ५६ वर्षे, रा. धानसा, ता. भिनमाल, राज्य राजस्थान हे आले. त्यांनी फिर्यादीच्या क्रिएटिव्ह मेन्स वेअर या कापड दुकानात काही कपडे खरेदी केले.
यानंतर आरोपींनी पिवळ्या धातूच्या माळेतील एक मणी फिर्यादीस देत, हे मणी मिळाले असून ते खरे सोने असल्याचा दावा केला. हे सोने सोनाराकडे तपासून घ्यावे व पैशांची गरज असल्याने आरोपींकडील सर्व माल ८,००,००० रुपयांना विकत घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आरोपी वेळोवेळी फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून बनावट सोने विक्रीसाठी दबाव टाकत होते.
त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींनी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.४५ वाजता जामखेडहून खर्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंगोली हॉटेलजवळ ठरलेली रक्कम घेऊन येण्यास फिर्यादीस बोलावले होते.
दरम्यान, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हा घडण्यापूर्वीच मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पथक खर्डा रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते.
त्याचवेळी हॉटेल रंगोली परिसरात फिर्यादी, त्यांचा भाऊ व मित्र चारचाकी वाहनातून गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस त्यांच्या जवळील बनावट सोने देत पैशांची मागणी केली. फिर्यादीने हे सोने बनावट असल्याचे सांगताच आरोपी अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी), वय २४ वर्षे आणि प्रविणकुमार मोहनलाल बागरी, वय २५ वर्षे, रा. भिनमाल, राज्य राजस्थान यांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांच्या खिशातील ३,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
घटनास्थळी गोंधळ व आरडाओरड झाल्याचे लक्षात येताच खर्डा रोडवर सापळा रचून पेट्रोलिंग करत असलेले पो. ना. वाघ, पो. कॉ. देविदास पळसे, पो. कॉ. घोळवे व पो. कॉ. शेवाळे यांनी तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले. पुढील चौकशीत आरोपींनी त्यांच्या सोबत असलेला तिसरा आरोपी खर्डा बसस्थानक परिसरात थांबलेला असल्याची माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी क्रमांक तीन मोहनलाल बालाजी बागरी, वय ५६ वर्षे, रा. धानसा, ता. भिनमाल, राज्य राजस्थान यास खर्डा येथून ताब्यात घेतले.
या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी गणेश महादेव खेत्रे, वय ३२ वर्षे, व्यवसाय कापड दुकान, रा. महादेव गल्ली, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. रजि. नं. ६६४/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३११(२), ३२८(४), ३२८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या अंगझडतीत फिर्यादीकडून जबरदस्तीने काढून घेतलेली ३,००० रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले पिवळ्या धातूचे बनावट सोन्याचे माळे, अंदाजे वजन १ किलो असा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, किशोर गावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे, पोलीस नाईक रविंद्र वाघ, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, शशिकांत म्हस्के तसेच मोबाईल सेलचे नितीन शिंदे, राहुल गुंडू यांचा समावेश होता.
Back to top button