📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

हरिदास महाराज सोळंके यांच्या निवासस्थानी भक्तिमय भजन संध्या संपन्न

हरिदास महाराज सोळंके यांच्या निवासस्थानी भक्तिमय भजन संध्या संपन्न
बीड प्रतिनिधी :
दिंद्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा प्रख्यात कीर्तन-भजनसेवक ह.भ.प. हरिदास महाराज सोळंके यांच्या निवासस्थानी आज, दि. ५ जुलै २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात भजन संध्या संपन्न झाली.
या भजन संध्येत भीष्म भागवताचार्य ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कोटुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंगाच्या नामस्मरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कार्यक्रमात मृदंगाची साथ मृदंगविशारद चंद्रकांत जोशी यांनी केली, तर गायनाची साथ संगीतविशारद सुनील महाराज अंडील, संगीतविशारद संतोष महाराज ठोंबरे, सूर्यकांत आप्पा काटकर, सुधाकर सोळंके आणि ह.भ.प. हरिदास महाराज सोळंके यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत वसिष्ठ सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण भजन संध्येत पांडुरंग परमात्म्याचे गुणगान करणारे अभंग, गवळणी आणि विविध भक्तिगीते अत्यंत भावपूर्ण व भारदस्त शैलीत सादर करण्यात आली. त्यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या प्रसंगी सोळंके परिवार, मित्रपरिवार तसेच अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमानंतर उपस्थितांचे ह.भ.प. श्री हरिदास सोळंके व पुरुषोत्तम महाराज कोटुळे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
ह.भ.प. हरिदास महाराज सोळंके हे ज्ञानेश्वरी, गाथा व संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून भजन-कीर्तन क्षेत्रातील त्यांची सेवा उल्लेखनीय आहे. त्यांच्या आनंदी, प्रेमळ आणि मार्गदर्शक स्वभावामुळे मित्रपरिवार त्यांना प्रेमाने “भजनानंदी महाराज” या नावानेही संबोधतो. स्वतः उत्कृष्ट भजनसेवा करण्याबरोबरच नवोदित गायकांना प्रोत्साहन देऊन त्यांना घडविण्याचा त्यांचा आगळावेगळा गुण सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे.
Back to top button