बीड
गॅस वितरणातील अनागोंदीचा उद्रेक; डॉ. हेडगेवार चौकात रिकाम्या टाक्यांसह चक्काजाम आंदोलन

गॅस वितरणातील अनागोंदीचा उद्रेक; डॉ. हेडगेवार चौकात रिकाम्या टाक्यांसह चक्काजाम आंदोलन
नायगाव/अरविंद शिंदे
नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौक येथे काल दिनांक १८ मे रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता गॅस वितरणातील सततच्या विलंब आणि अनागोंदीविरोधात नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. संतप्त नागरिकांनी रिकाम्या गॅस टाक्या रस्त्यावर टाकून नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली असून वाहनांच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून गॅस बुकिंगसाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून ओ.टी.पी प्राप्त होत असतानाही ८ ते १० दिवस घरपोच गॅस सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा एजन्सीकडे संपर्क करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजना आणि घरगुती गॅस वितरण व्यवस्थेला “घरपोच व पारदर्शक सेवा” अशी ओळख देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नायगाव परिसरात नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने डिजिटल प्रणालीद्वारे पारदर्शकता आणण्याचा दावा केला असला तरी ओ.टी.पी मिळूनही सिलिंडर न मिळणे, वितरणात होणारा विलंब आणि ग्राहकांना स्पष्ट माहिती न देणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
काल सकाळी नागरिक गॅस संदर्भात विचारणा करण्यासाठी डॉ. हेडगेवार चौकातील शगुन इंडियन कार्यालयात गेले असता कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट चौकात रिकाम्या टाक्या ठेवून आंदोलन सुरू केले. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, “गॅस मिळाल्याशिवाय हटणार नाही” अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर नायब तहसीलदार येरावर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तहसीलदार नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न मार्गी लावतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अखेर रस्ता मोकळा केला.घटनेमुळे प्रशासनाची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि गॅस वितरण व्यवस्थेतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. संबंधित विभागाने यापूर्वी आलेल्या तक्रारींकडे वेळेत गांभीर्याने लक्ष दिले असते तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली नसती, अशी चर्चा परिसरात सुरू होती.
*चौकट :*
================
दरम्यान, आमच्या प्रतिनिधींनी शगुन इंडियन कार्यालय बंद का होते याबाबत माहिती घेण्यासाठी मॅनेजर निलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
*चौकट :*
============
वाहतूक कोंडी गंभीर होत असल्याने डी.वाय.एसपी श्याम पानेगावकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर अडकलेली वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.



