बीड

राजर्षी शाहू कन्या विद्यालयात ऑलिंपिक वीर स्व. खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी

राजर्षी शाहू कन्या विद्यालयात ऑलिंपिक वीर स्व. खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी

बीड (प्रतिनिधी):श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ संचलित, राजर्षी शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व राजमाता इंग्लिश स्कूल, तेलगाव रोड, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कुस्ती खेळाडू ऑलिंपिक वीर स्व. खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळाचे माजी अध्यक्ष कै. भाऊसाहेब जगताप यांचे पुतणे पुरुषोत्तम जगताप यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर ऑलिंपिक वीर स्व. खाशाबा जाधव व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव (दादा) जाहेर पाटील, संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके, विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक के. बी. सोंडगे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. टी. राऊत तसेच राजमाता इंग्लिश स्कूलच्या प्रभारी प्राचार्या हिना मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री. जगताप एस. सी. यांनी ऑलिंपिक वीर स्व. खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्रावर व क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीवर सविस्तर विचार मांडले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव (दादा) जाहेर पाटील व संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके यांच्या हस्ते सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले.

Back to top button