राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सूर्यनमस्कार तथा योग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अंजनगाव सुर्जी|राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद उच्च प्राथमिक शाळा, अंजनगाव सुर्जी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार व योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम असल्याचे महत्त्व विशद करत डॉ. संगीता गोविंद मेण (योगप्रशिक्षक, पतंजली योग समिती) यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर विद्यार्थिनींनी प्रभावी भाषणे सादर केली.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दिनेश खडके सर, शोभा थोरात मॅडम, अर्चना दुर्गे मॅडम व समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भास्करराव बोंद्रे सर (माजी प्राचार्य, पतंजली योग समिती) यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संगीता गोविंद मेण,
अंबादासजी रेखाते (उपाध्यक्ष), गणेश माकोडे (पालक वर्ग), निता मोगरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती आवंडकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शोभा नाठे मॅडम यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष रेखाते सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.



