तरुणाईला नशेच्या गर्तेत नेणारा सनबर्न फेस्टिवल हवा कशाला ?

गेल्या काही दिवसांत वृत्तपत्र वाचताना राज्यात कुठेनाकुठे अमली पदार्थाचा साठा पकडल्याच्या बातम्या प्रतिदिन वाचनात येत आहेत. वाचून कोणाचेही डोळे पांढरे व्हावेत एव्हढे या अमली पदार्थांचे बाजारमूल्य असते. अर्थात जेव्हढे अमली पदार्थ पकडले जाते तेव्हढेच वृत्तपत्रांत छापून येते यापेक्षा कित्येक पटीने आज ते राज्यभर वितरित झाले आहे. ज्या राज्याची ओळख जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अशी करण्यात येते आज त्या महाराष्ट्राची ओळख देशातील सर्वात कर्जबाजारी राज्य, स्त्री अत्याचारात पहिल्या क्रमांकाचे राज्य अशी होऊ लागली आहे, गेल्या काही दिवसांतील बातम्या वाचल्यावर अमली पदार्थाचा सर्वात जास्त विळखा पडलेले राज्य म्हणून महाराष्ट्र आपली ओळख निर्माण करेल कि काय अशीही भीती आता वाटू लागली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात २०१६ मध्ये सनबर्न फेस्टिव्हल झाला आणि पुण्यात विविध ठिकाणाहून अमली पदार्थाचा साठा पकडल्याच्या बातम्या वाचण्यात येऊ लागल्या. शालेय विद्यार्थीसुद्धा अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे गेल्या काही वर्षांत पुण्यात पाहायला मिळाले. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांनाच अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्यांनी लक्ष्य केले. अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्यांचे कनेक्शन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले होते. संगीताच्या नावावर सनबर्न फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम वर्षाच्या अखेरीस आयोजित केले जातात. भोगवादाला प्रोत्साहन देणारे हे पाश्च्यात्य कार्यक्रम तशाच प्रकारचे वातावरण तयार करतात. या वातावरणात झिंगण्यासाठी मद्यपानाची या ठिकाणी पुरेपूर रेलचेल असते सोबत अमली पदार्थ पुरवणारी माणसेही वावरत असतात जे आपले टार्गेट बरोबर हेरतात. या कार्यक्रमाला धनदांडग्यांचीच मुले अधिक येत असल्याने अमली पदार्थ विकत घेणे यांच्यासाठी विशेष बाब नसते. अमली पदार्थ विकणाऱ्यांसाठी असे फेस्टिव्हल म्हणजे सावज बनवण्यासाठी पर्वणी असते. याठिकाणी हेरलेलया सावजाची शिकार ते येथून बाहेर पडल्यावर पुढील काही काळात पद्धतशीरपणे करतात. एकाच्या मदतीने दुसरा, दुसऱ्याच्या मदतीने तिसरा यांच्या गळाला लागतो आणि नशेच्या आहारी गेलेला तरुण पुढे यांच्याच इशाऱ्यावर नाचू लागतो. नशेखोरीला प्रोत्साहन देणारे आणि भोगवादाला खतपाणी घालणारे असे कार्यक्रम राज्यात हवेत तरी कशाला ? केवळ कोट्यवधींचा महसूल मिळतो म्हणून महाराष्ट्र सरकारने आता राजधानी मुंबईत या फेस्टिव्हलला परवानगी दिली आहे. १७ ते २१ डिसेम्बरला मुंबईतील शिवडी भागात होणाऱ्या या महोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. जे पुण्यात घडले तेच पुढील काही वर्षांत मुंबईत होणार हे निश्चित आहे. एकीकडे आम्ही शिवरायांचे मावळे असल्याच्या बतावण्या करून जनतेला भावनिक साद घालायची आणि दुसरीकडे संस्कृतीचे भंजन करू पाहणाऱ्या, तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या पाश्च्यात्य फेस्टिव्हलला आर्थिक राजधानीत परवानगी द्यायची हा दुटप्पीपणा नव्हे का ? देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला नशेच्या गर्तेत जाण्यापासून रोखायचे असेल तर सनबर्न फेस्टिव्हलला शक्तीनिशी विरोध करून कार्यक्रमाला दिलेली परवानगी रहित करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा लागेल !


