📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सात दिवस भव्य दिव्य तुळशी पूजा व श्रीमद्भागवत सप्ताह भक्तिभावात संपन्न

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सात दिवस भव्य दिव्य तुळशी पूजा व श्रीमद्भागवत सप्ताह भक्तिभावात संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी..
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे पंढरपूर नारायण गड मठाच्या वतीने सात दिवसांचा भव्य दिव्य तुळशी पूजा व श्रीमद्भागवत सप्ताह कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने, शिस्तबद्ध नियोजनात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या धार्मिक अनुष्ठानास नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाचे लाभ मिळाले असून ह.भ.प. प्रेममूर्ती शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र नारायण गड यांच्या पावन आशीर्वादाने कार्यक्रम अधिकच मंगलमय ठरला.
या संपूर्ण सप्ताहाचे कुशल नियोजन व मार्गदर्शन नारायण गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकोप्याचे व भक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.
सात दिवस चाललेल्या या श्रीमद्भागवत सप्ताहासाठी बीड, जालना, पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविकांनी पंढरपूर नारायण गड मठ येथे हजेरी लावली. भाविकांनी तुळशी पूजन, अभिषेक, आरती, भजन-कीर्तन तसेच कथा श्रवणाचा लाभ घेतला. या सप्ताहात विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. हजारो महिला भगिनी भक्तिरसात तल्लीन झालेल्या पाहावयास मिळाल्या.
श्रीमद्भागवताची संगीतमय कथा ह.भ.प. गुरुवर्य ज्योतिषाचार्य बबनदेव महाराज जोशी यांनी आपल्या सुमधुर, ओघवत्या वाणीने सादर केली. त्यांच्या कथाकथनातून भक्ती, वैराग्य, संस्कार आणि जीवनमूल्यांचा संदेश प्रभावीपणे भाविकांपर्यंत पोहोचला. कथेसाठी नागपूरचे कैलास लोखंडे तसेच अमरावतीचे रुपेश खोडे यांनी उत्कृष्ट व भक्तिरसपूर्ण साथसंगत केली.
ह.भ.प. प्रेममूर्ती शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र नारायण गड यांच्या आज्ञेनुसार ह.भ.प. खरात महाराज (आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सात दिवसीय सप्ताहाची सांगता झाली. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरस मार्ग, काळेवाडी, टाकळगव्हाण, तरटेवाडी, शहाजनपूर, लोळदगाव तसेच बीड, जालना, पुणे, अहिल्यानगर आदी अनेक जिल्ह्यांतील भाविकांनी अन्नदान महापंगतीद्वारे मोलाचे सहकार्य केले. या सेवेमध्ये माननीय अमरसिंहजी पंडित (सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस), माननीय सुरेश रावजी नवले (माजी ऊर्जामंत्री, बीड) यांच्यासह अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती व भाविक सहभागी झाले होते.
या सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपूर परिसर भक्तिरसाने भारावून गेला असून, सामाजिक एकता, भक्तीभाव व सेवा परंपरेचे सुंदर दर्शन या सप्ताहातून घडल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
Back to top button