बीड

आष्टीत दोन कोटींच्या अत्याधुनिक सार्वजनिक अभ्यासिकेचे आ.धस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आष्टीत दोन कोटींच्या अत्याधुनिक सार्वजनिक अभ्यासिकेचे आ.धस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आष्टी(प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार अभ्यास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आष्टी नगरपंचायतच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन कोटी रुपये निधीच्या अत्याधुनिक सार्वजनिक अभ्यासिकेचे भूमिपूजन गुरुवारी आ.सुरेश धस यांच्या हस्ते पार पडले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असले तरी त्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा व पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन आधुनिक सुविधा, शांत वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार सुसज्ज अशी सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याचे यावेळी धस यांनी सांगितले.तसेच पुढे बोलताना या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास व्यवस्था, आधुनिक सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे दर्जेदार अभ्यास सुविधा आपल्या तालुक्यातच मिळणार असल्याचेही धस शेवटी म्हणाले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारुंगुळे,भारत मुरकुटे,शरीफ शेख, ज्ञानदेव राऊत, इंजिनीयर शिरसाट आदी उपस्थित होते.

Back to top button