बीड

होर्डिंग्जमुक्तीसाठी “नाशिक पॅटर्न” बीडमध्ये राबवावा बॅनरवर झळकलेल्या चेहऱ्यावर थेट एफआयआरची मागणी– डॉ. गणेश ढवळे

होर्डिंग्जमुक्तीसाठी “नाशिक पॅटर्न” बीडमध्ये राबवावा
बॅनरवर झळकलेल्या चेहऱ्यावर थेट एफआयआरची मागणी– डॉ. गणेश ढवळे
बीड (दि. १४):
नाशिक शहरात अनधिकृत बॅनर व होर्डिंग्जविरोधात राबवण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे “होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न” राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिक शहर पोलिसांनी अवघ्या १० दिवसांत बॅनरवर झळकलेल्या व्यक्तींवर थेट एफआयआर दाखल करत २१ पेक्षा अधिक गुन्हे नोंदवले आहेत. याच धर्तीवर बीड शहरातही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
बीड शहरात सध्या नेते व व्यावसायिकांकडून सर्रासपणे अनधिकृत बॅनर, कटआऊट्स व होर्डिंग्ज लावले जात असून त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच रस्त्यांवर अडथळे निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढला आहे. मात्र नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रकाराला आळा बसत नसल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, प्रशासन मौनात
नगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर बीड नगरपालिकेने फक्त ३८ ठिकाणी बॅनर व कटआऊट्स लावण्याची परवानगी दिली होती. असे असतानाही शहरभर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर लावण्यात आले. आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन होऊनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
न्यायालयीन आदेश केवळ कागदोपत्री?
यापूर्वी न्यायालयाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना शहर बॅनरमुक्त ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकांकडून दरवर्षी शपथपत्र दाखल केले जाते. मात्र प्रत्यक्षात बॅनरमुक्ती केवळ कागदोपत्रीच असून, न्यायालयाची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन
या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड, मुख्याधिकारी नगरपरिषद बीड व पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
बीड शहरात “नाशिक पॅटर्न”प्रमाणे बॅनरवर झळकलेल्या व्यक्तींवर थेट एफआयआर दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
Back to top button