📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अंबाजोगाईत गणेश विसर्जनासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आ. नमिता मुंदडा यांचे निर्देश

अंबाजोगाईत गणेश विसर्जनासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आ. नमिता मुंदडा यांचे निर्देश
 अंबाजोगाई प्रतिनिधी : शहरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव सुरू आहे. त्याच प्रमाणे गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. विसर्जन सोहळ्यात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिले आहेत. त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन विविध ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि सुबक व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
मुंदडा यांनी पत्रातून नमूद केले आहे की शहरातील विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनासाठी दोन स्वतंत्र क्रेनची सोय करावी, तसेच बोरूळ तलाव परिसरातील झाडे व झुडपे कापून स्वच्छ जागा उपलब्ध करून द्यावी. शिवाय त्या परिसरात पुरेशी व सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी.
गणेश भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीसाठी आवश्यक ते बदल करावेत आणि काही रस्ते बंद करण्याची कार्यवाही करावी. मागील काही वर्षांपासून वापरात असलेल्या फिरत्या कृत्रिम तलावांनाही विविध ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, ज्यामुळे लहान मूर्ती विसर्जनास सोय होईल असेही निर्देश दिले आहेत.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरती शौचालये व आवश्यक ती अन्य सुविधा पुरवण्याची जबाबदारीही नगरपरिषदेवर सोपवण्यात आली आहे.
नगरपरिषदेने तातडीने सर्व उपाययोजना करून विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यावर आमदार मुंदडा यांनी भर दिला आहे. विसर्जनावेळी होणारी गर्दी आणि संभाव्य अडचणी लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यास नागरिकांना सुरक्षित आणि सुबक वातावरणात गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Back to top button