महाराष्ट्रातले शिवप्रेमी झोपले का?हिंदुत्ववादी ठेकेदार कुठे? ॲड. डॉ. अरुण जाधव

महाराष्ट्रातले शिवप्रेमी झोपले का?हिंदुत्ववादी ठेकेदार कुठे? ॲड. डॉ. अरुण जाधव
जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे ‘वाचनातून आंदोलन’
जामखेड प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही अवमानकारक वक्तव्य करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. आज महाराष्ट्रात शिवप्रेमी झोपले आहेत का? स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे ठेकेदार अशा वेळी कुठे जातात? राजांचा वापर फक्त मतदानासाठी आणि राजकारणासाठीच केला जातो का? अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड.डाॅ. अरुण जाधव यांनी दिली.
आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव व नगरसेविका संगीताताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या वाचनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विविध अंगांनी आढावा घेण्यात आला. लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारा राजा, रयतेची कणव असलेला शासक, स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करणारा, व्यापार-उद्योगाचे संरक्षण करणारा तसेच गुलाम व्यापारास बंदी घालणारा दूरदृष्टीचा राजा म्हणून शिवाजी महाराजांचे विचार मांडण्यात आले. राज्यकारभारातील भाषा, धर्मनिरपेक्षता, विविध समाजघटकांचा सहभाग, तसेच शेतकरी व सामान्य जनतेशी असलेले नाते यावरही प्रकाश टाकण्यात आला.
पुढे बोलताना ॲड.डॉ. जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा.यावेळी जाधव यांनी बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जाती-धर्मांच्या सर्व समाजाचे राजे आहेत. त्यांच्या विचारांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
लोकाधिकार आंदोलनचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ बोलताना ठामपणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे व रयतेचे प्रतिपालक आहेत.आमदार संजय गायकवाड यांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोलले पाहिजे. समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची गरळ ओकणे टाळले पाहिजे. छत्रपतींच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याऐवजी त्यांच्या विचारांचे आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे.
यावेळी शहाजी डोके, रजनी बागवान, संगीता भालेराव, उर्मिला कवडे आदींनी पुस्तकाचे वाचन केले.यावेळी विशाल पवार,सामाजिक कार्यकर्ते अनिल सदाफुले, रामचंद्र भालेराव, सुमित भालेराव, सुरज भालेराव,अंकल घायतडक, विकी कांबळे, सुशील राजगुरू, ऋषिकेश गायकवाड, रामेश्वर काळे, अश्विनी काळे, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



