मराठा आंदोलनाचा लढा सुरूच; मनोज जरांगे पाटील पुन्हा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

मराठा आंदोलनाचा लढा सुरूच; मनोज जरांगे पाटील पुन्हा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत
१६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत आंदोलनाच्या तारखेची मोठी घोषणा होणार
गेवराई (अंकुश आतकरे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात संघर्ष उभारणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला लढा कायम राहणार असून येत्या १६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाच्या पुढील टप्प्याची आणि आंदोलनाच्या तारखेची मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या आंदोलनाला राज्यातील मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला होता. आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली जाणार असल्याने राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा सुरूच राहणार असून सरकारने दिलेली आश्वासने आणि आरक्षणासंदर्भातील निर्णय याबाबत समाजात नाराजी असल्याचेही आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आगामी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागले असून आंदोलनाच्या पुढील रणनीतीची उत्सुकता निर्माण झाली आहे.



