📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

स्नेहालयची अनुभूती सायकल यात्रा;जामखेड होणार दाखल सद्भावनेचा करणार जागर-योगेश अब्दुले

स्नेहालयची अनुभूती सायकल यात्रा;जामखेड होणार दाखल सद्भावनेचा करणार जागर-योगेश अब्दुले

जामखेड । प्रतिनिधी
समाजात वाढत चाललेला द्वेष,संशय आणि हिंसेला छेद देत माणुसकी,अहिंसा व धर्मनिरपेक्षता,बालविवाह प्रतिबंध’चा संदेश देणारी स्नेहालय संस्थेची महाराष्ट्रव्यापी ‘सद्भावना सायकल यात्रा क्र.११’ दि.०८ व ०९ जानेवारी ला जामखेड तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहे.नांदेड (मराठवाडा) येथून सुरू झालेली ही सायकल यात्रा १२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे समारोपाला येणार आहे.नांदेड ते स्नेहालय अहिल्यानगर असा एकूण ८१७ किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करणारी ही यात्रा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्हे,तालुके आणि ग्रामीण भागातून जात आहे.जामखेड परिसर व तालुक्यात या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा,राष्ट्रीय एकात्मता,मानवी मूल्ये व युवकांचे प्रबोधन यावर भर देण्यात येणार आहे.या यात्रेत ५० सायकलस्वार युवक-युवती सहभागी असून दररोज ७० ते ९० किलोमीटरचा प्रवास करत विविध गावांमध्ये युवक संवाद,महाविद्यालयीन चर्चासत्रे, सामाजिक संस्थांशी बैठक व नागरिकांशी थेट संवाद साधला जात आहे.
जामखेड व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी,स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा या उपक्रमाला सक्रिय प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद,संत तुकाराम,गुरु नानक यांसारख्या थोर समाजसुधारकांच्या मानवतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे संचालक हनिफ शेख,प्रवीण कदम व आयोजकांनी सांगितले.ही सायकल यात्रा कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून पूर्णतः सामाजिक व लोकचळवळीच्या स्वरूपाची आहे. जामखेडसारख्या ग्रामीण भागात युवकांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.अहिल्यानगर येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था,युवक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असे प्रकल्प समन्वयक विकास सुतार यांनी सांगितले.

Back to top button