बीड
मायबाप सरकार स्मार्ट अंगणवाड्या करताना आमच्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी इमारत तरी द्या! – बेलगाववस्ती पालकांची मागणी ; जिल्ह्यातील ९३८ अंगणवाड्या ईमारतीविना :- डॉ.गणेश ढवळे

मायबाप सरकार स्मार्ट अंगणवाड्या करताना आमच्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी इमारत तरी द्या! – बेलगाववस्ती पालकांची मागणी ; जिल्ह्यातील ९३८ अंगणवाड्या ईमारतीविना :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.१९): राज्य शासनाकडून अंगणवाड्यांना १ लाख ६४ हजार ५६० रुपये किंमतीचे “स्मार्ट अंगणवाडी कीट” देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र बेलगाववस्ती सारख्या ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्या आजही पत्र्याच्या शेड, किरायाच्या रूम किंवा समाजमंदिरात भरतात.
गेल्या ७–८ वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या बेलगाववस्ती अंगणवाडीतील १८ बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न अद्याप कायम आहे.
पालक सुमंत कोळपे म्हणाले, “पावसाळ्यात वादळ, वारा, गळती आणि विंचू-किड्यांची भीती वाटते. आमच्या वाट्याला तरी एक सुरक्षित इमारत मिळावी.”
अंगणवाडी सेविका दीपाली फरतारे यांनी सांगितले की ग्रामस्थांनी वारंवार इमारतीची मागणी केली असून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
जिल्ह्यातील ९३८ अंगणवाड्या इमारतीविना ; इमारतीसाठी निधी द्यावा:- डॉ.गणेश ढवळे
—
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, बीड जिल्ह्यात २८८६ अंगणवाड्या असुन यातील ९३८ अंगणवाड्यांना ईमारत नाही. त्यामुळे बालकांना समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय अथवा पत्र्याच्या शेडमध्ये बसावे लागते.
“स्मार्ट कीट चांगले आहे; पण इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्रथम इमारत निधी देणे आवश्यक आहे.”
त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत पालकमंत्री अजितदादा पवार व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.



