📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

चिपळूण पालिकेचा वाचू आनंदाने हा उपक्रम नारायण तलावाच्या रम्य परिसरामध्ये संपन्न

चिपळूण प्रतिनिधी – प्रदीप पवार
चिपळूण नगर परिषदेने पुढाकार घेत लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहकार्याने “वाचू आनंदाने” हा उपक्रम हाती घेतला आहे. रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी नारायण तलाव,मार्कंडी येथे सकाळी या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. रविवारी सकाळी आठ ते दहा असे दोन तास मुलं, तरुण, वयोवृद्ध हे निसर्गाच्या सानिध्यात बसून वाचन करतात हे दृश्य चिपळूणकर नागरिकांना पहायला मिळाले. शहरातील दोन्ही वाचनालयाच्यावतीने ठरलेल्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध करून दिली गेली होती. काही मुलांनी स्वतःची पुस्तके आणली होती. निसर्गाच्या कुशीत बसून पुस्तक वाचण्यात एक वेगळा आनंद वाचकांना नक्कीच मिळाला. आजकाल मुलं सोशल मीडियावर वाचतात. इंटरनेटचा वापर करून पुस्तक वाचतात, असंही सांगितलं जातं. परंतु यातून होणारे आपल्या डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकेच वाचायला हवीत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी वाचनाची गोडी नव्या पिढीला लागावी, यासाठी वाचू आनंदाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दर रविवारी आठ ते दहा अशी ही वाचनाची वेळ ठरलेली असते यातील दीड तास वाचन आणि अर्धा तास आपण जे वाचलं त्यावर आपापसात चर्चा होते. हे सार केवळ आणि केवळ वाचन संस्कृती रुजावी यासाठीच आहे. नारायण तलाव येथे संपन्न झालेल्या वाचू आनंदाने या उपक्रमाबाबत ग्लोबल पर्यटनचे विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते कैसर देसाई, उद्योजक रामशेठ रेडीज, सौ. खातू व विद्यार्थींनी ओवी आमरे यांनी मनोगत व्यक्त केली. चिपळूणवासियांनी या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाच्या प्रसंगी उपनगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, साहित्यिक व वाचनालयांचे मार्गदर्शक प्रकाशजी देशपांडे, दोन्ही वाचनालयांचे संचालक, चिपळूणातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शाळांचे विद्यार्थी-शिक्षक, वाचनालय व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर व बापू साडविलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button