नान्नज येथे धक्का लागल्याने तिघांकडून तरुणास मारहाण; लाकडी ठोकळ्याने डोक्यात घाव

नान्नज येथे धक्का लागल्याने तिघांकडून तरुणास मारहाण; लाकडी ठोकळ्याने डोक्यात घाव
आरोपींना अटक व कडक कारवाईची मागणी
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील नान्नज येथील हॉटेलमध्ये पाणी घेण्याच्या कारणावरून तिघांनी तरुणास शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. हॉटेलमध्ये थांबलेल्या विक्रम बबन कोळी (रा. पोतेवाडी) याला पायाला धक्का लागल्याच्या कारणावरून सोमनाथ भरत मोहळकर, असिफ जब्बार शेख व छोट्या हारुन शेख यांनी प्रथम शिवीगाळ केली व ‘‘तु लई माजला का, तुला दाखवतो’’ असे धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर छोट्या हारुन शेखने मटन तोडण्याचा लाकडी ठोकळा डोक्यात घालून विक्रमला गंभीर जखमी केले.
दरम्यान, विक्रमचा भाऊ रमेश कोळी भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही सोमनाथ मोहळकरने मारहाण केली. तसेच असिफ शेख व छोट्या शेख यांनी त्यास देखील शिवीगाळ केली आणि ‘‘तुम्ही आमच्या नादी लागले तर तुम्हाला संपवून टाकीन’’ अशी धमकी दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जखमीवर उपचार सुरू असून आरोपींविरोधात साधे कलम लावून गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जखमीचे नातेवाईक महेश कोळी यांनी पोलिसांना निवेदन देऊन तिघा आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. डी. लोखंडे करत आहेत.



